विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्यासह शेतमजुराचा मृत्यू; अचलपूर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 06:37 PM2017-08-26T18:37:38+5:302017-08-26T18:38:11+5:30
विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्यासह शेतमजुराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.
परतवाडा, दि. 26- गणपती पाहण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा, तर शेतात काम करणाऱ्या एका मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना अचलपूर तालुक्यातील तोंडगाव व शिंदी येथे घटली आहे. कृष्णा प्रवीण काळपांडे (११.रा. तोंडगाव) व जगन्नाथ रामाजी धारपवार (६०,रा. शिंदी बु।) अशी मृतांची नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजतादरम्यान तोंडगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेश स्थापनेचा कार्यक्रम पाहण्यासाठी कृष्णा गेला होता. यावेळी तो मंडपाच्या बाजूला उभा असताना त्याचा स्पर्श उघड्या जिवंत तारेला झाला. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरेश नांदूरकर यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
दुसरी घटना शनिवारी सकाळी ११ वाजतादरम्यान शिंदी येथे घडली. मृत जगन्नाथ धारपवार हे बबन घुटे यांच्या शेतात निंदणासाठी गेले होते. गवताची कापणी करीत असताना एक्स्टेंशन लाईनला स्पर्श होताच त्याना जोरदार विजेचा धक्का लागला. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याचवेळी शेतात चार महिला देखील काम करीत होत्या, त्यापैकी दोघी सुदैवाने बचावल्या. एक्स्टेंशन लाईनला मुख्य वाहिनीचा स्पर्श झाल्याने ही घटना घडली.
याची माहिती पोलीस व वीज वितरण कंपनीला देण्यात आली असून पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, ठाणेदार सतीश आडे, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता इखार, तालका कार्यकारी अभियंता सोनोने यांनी भेट दिली. तालुक्यात लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे वीज कंपनीविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.