अमरावती जिल्ह्यात कीटकनाशकाची फवारणी करताना शेतमजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:56 PM2018-01-19T19:56:57+5:302018-01-19T19:59:50+5:30
चांदूर बाजार ताालुक्यातील खरवाडी येथे एका शेतमजुराचा फवारणी करताना मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सुदाम गंगाराम गभणे (५५, रा. खरवाडी) असे मृताचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चांदूर बाजार ताालुक्यातील खरवाडी येथे एका शेतमजुराचा फवारणी करताना मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सुदाम गंगाराम गभणे (५५, रा. खरवाडी) असे मृताचे नाव आहे. जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीदरम्यान मृत्यूची ही तिसरी घटना आहे.
प्राप्त महितीनुसार, तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या खरवाडी येथील शेतमजूर सुदाम गभणे हे गावातीलच विश्वनाथ इंगोले यांच्या शेतात हरभरा पिकावर फवारणीसाठी शुक्रवारी सकाळी ७ वाजता गेले होते. फवारणी करताना दुपारी १२ च्या सुमारास त्यांना भोवळ आली. बेशुद्धावस्थेत त्यांना शेतमालक व अन्य मजुरांनी चांदूरबाजार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मृताचा मुलगा योगेशने दिलेल्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी मर्ग दाखल केला.
याप्रकरणी ठाणेदार उदयसिंह साळुंके यांच्या मार्गदर्शनात संजय इंगोले व मंगेश म्हस्के तपास करीत आहेत. मृत सुदाम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. यासंदर्भात जिल्हा कृषी विकास अधिकारी उदय काठोडे यांना विचारणा केली असता, त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले.
रुग्णाला इस्पितळात आणले तेव्हा तो मृत झाला होता. त्याचा मृत्यू कशाने झाला, हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन झाले असून, अहवालानंतरच माहिती कळू शकेल.
- चिन्मय बुजुर्ग, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, चांदूरबाजार