पूर्णा नदीत बुडून मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 07:27 PM2017-09-27T19:27:59+5:302017-09-27T19:28:30+5:30
पूर्णा नदीपात्रात दोन दिवसांआधी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना मंगळवारी १५ वर्षीय कुमारिकेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. संजना संतोष राठी (१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
अमरावती - पूर्णा नदीपात्रात दोन दिवसांआधी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना मंगळवारी १५ वर्षीय कुमारिकेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. संजना संतोष राठी (१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, चांदूरबाजार तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावरील पिंपळखुटा येथील पूर्णा नदीपात्रात मृत संजना आपल्या एका मित्र व मैत्रिणीसोबत पूर्णा नदीत खेळण्यासाठी गेली होती. नुकताच पूर्णा नदीला पूर आल्यामुळे पात्रात दुथडी वाहत आहे. पाण्यातून वाहून येणारे लाकडे पकडण्याचा प्रयत्न तिने केला असता तिचा तोल गेल्यामुळे ती घसरून प्रवाहात वाहू लागली. तिच्या सोबतच्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.
संजना वाहून गेल्याची माहिती तिच्यासोबत असलेल्यांनी तिच्या पालकांना दिली. यानंतर तिचा शोध घेण्यात आला. तिचे प्रेत नजीकच्या टोंगलापूर येथील पूर्णा नदीच्या डोहात आढळून आले. स्थानिकांच्या सहाय्याने नदीतून प्रेत बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार वीरेंद्र अमृतकर करीत आहेत.
या घटनेनंतर पिंपळखुटा परिसरात शोककळा पसरली आहे, मागील तीन दिवसांत पूर्णा नदीपात्रात चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे यंदा तालुक्यात कमी पाऊस झाला. मात्र पूर्णेच्या परिसरातील तालुक्यातील काही गावांत अतिवृष्टी झाल्यामुळे व मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे नदीला चांगलाच पूर गेला आहे.