मेळघाटात गरोदर मातेचा मृत्यू
By admin | Published: May 9, 2016 12:09 AM2016-05-09T00:09:39+5:302016-05-09T00:09:39+5:30
तालुक्यातील बासपानी येथील गरोदर मातेचा शनिवारी मृत्यू झाला.
जि. प. सदस्यांचा रुग्णालयात ठिय्या : सीएसवर गुन्हा दाखल करा
धारणी : तालुक्यातील बासपानी येथील गरोदर मातेचा शनिवारी मृत्यू झाला. रात्री जि.प. सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणावर प्रहार करीत दोन तास ठिय्या मांडला. त्यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत, आरोग्य उपसंचालक गुल्हाणे यांचेशी संर्पक साधून सबंधित डॉक्टरांविरुद्ध कारवाईची मागणी केली. राजकुमार पटेल यांनीसुध्दा रात्री उपजिल्हा रुग्णालय गाठून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. स्त्रीरोग तज्ज्ञ शनिवारी उपस्थित नसल्याने हा प्रसंग ओढावल्याचा आरोप त्यांनी केला. शारदा अशोक धांडे (२३,रा. बासपानी) असे मृत गरोदर मातेचे नाव आहे. तिची ही पहिलीच प्रसूती होती. तिच्यावर २५ एप्रिल रोेजी उपचार करण्यात आले. तिला रक्तसुध्दा देण्यात आले, अशी माहिती जावरकर यांनी दिली. तिला गुरुवारी ६ मे रोजी रात्री १२.३० वाजता पुन्हा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिला अमरावतीला हलविण्याचा सल्ला शुक्रवारीच घेण्यात आाला. मात्र शारदाच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने तिच्यावर येथेच उपचार सुरु केला. शनिवारी रात्री ९ वाजता दरम्यान तिला अत्यंत वेदना सुरू झाल्या. तिच्यावर तीन डॉक्टरांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. जि.प. सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी यासाठी आरोग्य प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत दोन तास उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला होता. दरम्यान, माजी आमदार राजकुमार पटेल यांनी सुध्दा भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. मृतकाच्या नातलगांनी रात्रीच आरोग्य विभागाविरुध्द पोलिसात तक्रार दाखल केली असून शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार सुधीर पाटील यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)