‘त्या’ न्यायाधीन कैद्याचा मृत्यू मारहाणीमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:15 AM2021-09-24T04:15:25+5:302021-09-24T04:15:25+5:30
अमरावती : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात १७ जून २०२० रोजी रात्री अचानक भोवळ आल्याने एका न्यायबंदीचा मृत्यू झाला ...
अमरावती : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात १७ जून २०२० रोजी रात्री अचानक भोवळ आल्याने एका न्यायबंदीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने २२ सप्टेंबर रोजी रात्री अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्या न्यायबंद्याला मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाला होता. भुता गोमा चतुरकर (४८, रा. मानी, ता. आठनेर, जि. बैतूल, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे.
भुता चतुरकर याच्यावर मोर्शी पोलीस ठाण्यात एक वर्षाआधी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात मोर्शी पोलिसांनी त्याला अटक करून प्रथम पोलीस कोठडीत घेतले. त्यानंतर न्यायालयाने चतुरकरला न्यायालयीन कोठडी सुनावली. मोर्शी पोलिसांनी त्याची अमरावती कारागृहात रवानगी केली होती. १७ जून २०२० च्या रात्री ८ वाजता चतुरकर येथील कारागृहात टीव्ही पाहत असताना अचानक चक्कर येऊन पडल्यामुळे त्याला लगेच इर्विन रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केले. त्यावेळी फ्रेजरपुरा पोलीस उपनिरीक्षक राजू लेवटकर यांनी घटनास्थळ पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन मर्ग दाखल केला. या प्रकरणात बुधवारी पोलिसांना चतुरकर याचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला.
पीएम रिपोर्टनुसार, चतुरकरच्या अंगावर अंतर्गत माराच्या जखमा असल्यामुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याचे दिसून आल्याचे नमूद आहे. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.