गणोरी शिवारात वीज तारेच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:20 PM2018-06-23T22:20:05+5:302018-06-23T22:20:30+5:30
भातकुली तालुक्यातील गणोरी येथे २० वर्षीय विद्यार्थी युवकाचा तुटून पडलेल्या वीजतारांनी बळी घेतला. ही घटना शनिवारी दुपारी गावालगतच्या आखरात घडली. यासंदर्भात महावितरणविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गणोरी : भातकुली तालुक्यातील गणोरी येथे २० वर्षीय विद्यार्थी युवकाचा तुटून पडलेल्या वीजतारांनी बळी घेतला. ही घटना शनिवारी दुपारी गावालगतच्या आखरात घडली. यासंदर्भात महावितरणविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
अझर शाह नजर शाह (२०) असे मृताचे नाव आहे. तो शनिवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गावालगतच्या आखरात गेला होता. बकºयांना धोका पोहोचू नये म्हणून खाली पडलेल्या जिवंत तार बाजूला करण्याच्या प्रयत्नात त्यांचा स्पर्श होऊन अझरचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. काही युवकांनी सावधगिरी बाळगत विद्युत तारेपासून त्याला विलग केले. यानंतर भातकुली पोलिसांसह महावितरण कर्मचाºयांना माहिती देण्यात आली.
दरम्यान, अझरच्या मृत्यूने महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गणोरी ग्रामपंचायतीने शिवारात वीज खांबावरील तारा तुटून खाली पडल्याबाबत वारंवार निवेदने देऊनही काहीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. उपसरपंच मिलिंद अवघड यांनी हा महावितरणने घेतलेला बळी असल्याचे म्हटले आहे. महावितरणविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.