यवतमाळ मार्गावर मृत्यूचे सापळे; सार्वजनिक बांधकाम विभागाचे हातावर हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:12 AM2021-09-13T04:12:19+5:302021-09-13T04:12:19+5:30
अमरावती : बडनेरा ते यवतमाळ राज्य मार्ग कमालीचा खड्डेमय झालेला असून मोठमोठे भगदाड पडलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने ...
अमरावती : बडनेरा ते यवतमाळ राज्य मार्ग कमालीचा खड्डेमय झालेला असून मोठमोठे भगदाड पडलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या मार्गावर प्रवास म्हणजे मरयातना असून, दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे.
बडनेरा उपविभाग अंतर्गत येणारा बडनेरा ते यवतमाळ राज्य महामार्ग अमरावती जिल्ह्याच्या सीमापर्यंत ३५ कि.मी. अंतरावर हजारो खड्डे पडलेले आहे. विशेष म्हणजे माहुली चोर ते शिवणीपर्यंतच्या मार्गावर मधोमध दोन फुटाचे खोल खड्डे पडलेले आहे. या मार्गावरून यवतमाळ ते अमरावती अशी वाहनांची वर्दळ असते. खेड्यापाड्यातून ग्रामस्थ कामासाठी अमरावतीत येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम विभागाने या मार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्याचे सौजन्य न दाखविल्याने यंदाच्या वर्षी मोठमोठे खड्डे पडलेले आहे.
---------------
खड्डे भरणार केव्हा?
नवीन रस्ता होणार असल्याचा बागुलबुवा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता करीत आहे. मात्र, मार्गासाठी अद्यापही निधी मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ज्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता पार उखडला आहे. किमान त्या ठिकाणी डांबराने खड्डे भरण्याचे सौजन्य का दाखविले जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे नेर उपविभाच्या हद्दीतील शिवणी सीमेपासून यवतमाळपर्यंत रस्ता चकाचक आहे. तथापि, अमरावती जिल्ह्याच्या सीमेपासून तर जवळा फाटापर्यंत मार्गाची डागडुजी बडनेरा उपविभाग का करीत नाही, हेच कळेनासे झाले आहे.
--------------------------
डागडुजीचा निधी गेला कुठे?
दरवर्षी रस्त्यावरील खड्डे भरणे, रस्त्याच्या बाजूचे गवत कापणे, पाण्यासाठी नाल्या काढणे याकरिता निधी मिळते. मात्र, यवतमाळ मार्गावर हे अनुदान न मिळाल्याचे कारण पुढे करीत बांधकाम विभाग वाहनाधारकांच्या जीवाशी खेळत आहे. खड्ड्यात रस्ता की रस्तात खड्डे, अशी गंभीर अवस्था बडनेरा ते यवतमाळ मार्गाची शिवणीपर्यंत झाली आहे. या मार्गावरील वास्तव्यास असलेले ग्रामस्थ रस्त्याच्या दुरवस्थेने कमालीचे चिडून आहेत.
----------------
अभियंत्यांना मृत्यूची प्रतीक्षा
यवतमाळ मार्गावर खड्डे पडले असून, वाहनचालकांना रस्ता शोधताना कसरत करावी लागत आहे.
तब्बल दोन वर्षांपासून ना रस्ता दुरुस्ती, ना डांबरीकरण केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मोठा अपघात होऊन लोकांच्या मरणाची वाट तर बघत नाही, असा सवाल माहुली चोर, धानोरा गुरव, सावंगा, नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापूरचे नागरिक करीत आहेत.