अमरावती जिल्ह्यातल्या चिखली आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:23 PM2018-08-06T13:23:57+5:302018-08-06T13:25:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चिखलदरा तालुक्यातील चिखली येथील शासकीय आश्रमशाळेतील संवर्गाच्या विद्यार्थिनीचा शनिवारी रात्री धारणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकासह संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे
प्रीती साबुलाल कासदेकर (१०, रा. कारा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. चिखली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता सहावीत शिकणारी प्रीती मागील सहा दिवसांपासून आजारी होती. शनिवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्यानंतर ती दोन किलोमीटर अंतरावरील आपल्या गावी पायी गेली. प्रकृती खालावल्याने पालकांनी तिला हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु शनिवारी रात्री १२ वाजता तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी १२ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्याध्यापक, अधीक्षक किंवा वर्गशिक्षकांपैकी तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
संबंधितांवर गुन्हे दाखल करा
प्रीती ही आजारी असतानाही सर्वांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच तिची प्रकृती जास्त खालावली आणि मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांसह आदिवासी गावकऱ्यांनी केली आहे. युवक काँग्रेसचे पंकज मोरे यांच्या नेतृत्वात सोमवारी प्रकल्प अधिकाऱ्यांसह संबंधितांना निवेदन दिले जाणार आहे.
शवविच्छेदन झालेच नाही
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना प्रीती मृतावस्थेतच तेथे दाखल झाल्याचे लेखी बयान वडील साबुलाल कासदेकर यांनी दिले. याशिवाय शवविच्छेदन न करण्याचेसुद्धा लिहून दिले. यामुळे शवविच्छेदन न करताच मध्यरात्री २ वाजता प्रीतीचा मृतदेह परिजनांच्या ताब्यात मृतदेह दिला, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हेमंत भिलावेकर यांनी दिली. त्यामुळे प्रीतीचा मृत्यू नेमका कशाने झाला, याचा खुलासा झालेला नाही. हरिसाल येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रीतीला उपजिल्हा रुग्णालयात जिवंतच दाखल करण्यात आले होते. आता मृत्यूचे कारण शोधण्यासाठी न्यायालयाच्या आदेशावरूनच पुन्हा मृतदेह काढून शवविच्छेदन करावे लागणार, हे विशेष.
चिखली शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना दु:खद आहे. यासंदर्भात आपण संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- राहुल कर्डिले, प्रकल्प अधिकारी, धारणी