चिमुकल्याचा मृत्यू; नातेवाईकांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तोडफोड
By admin | Published: April 3, 2015 11:51 PM2015-04-03T23:51:49+5:302015-04-03T23:51:49+5:30
दोन वर्षीय चिमुकल्याला भाजलेल्या अवस्थेत दाखल केल्यावर त्यांचा तासभरानंतर मृत्यू झाला.
उपचारात हलगर्जीपणा : भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
अमरावती : दोन वर्षीय चिमुकल्याला भाजलेल्या अवस्थेत दाखल केल्यावर त्यांचा तासभरानंतर मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हयगय केल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा इर्विन रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.
माहितीनुसार, कारंजा लाड तालुक्यात येवर्डा येथील रहिवासी नंदू रिठे यांचे किराणा दुकान आहे. दुकान व घर एकाच ठिकाणी असल्यामुळे कुटुबींतील सदस्य नेहमीच दुकानात ये-जा करतात. गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजतादरम्यान नंदू रिठे यांनी दुकानात दिवा लावला होता. दरम्यान त्यांची दोन वर्षीय मुलगी गायत्री दुकानात आली असता दिवा अचानक कागदावर पडल्याने कागदांनी पेट घेतला. क्षणातच आगीचा भडका उडाल्याने गायत्री ९० टक्के भाजली. तिला तत्काळ कारंजा लाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारकरिता नेण्यात आले. गुरुवारी रात्री तिच्यावर उपचार सुरुच होते. मात्र तिची प्रकृती खालावल्याने तिला शुक्रवारी सकाळी ११ वाजता अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वार्ड क्रमांक ४ मध्ये गायत्रीवर तब्बल तासभर उपचार करण्यात आले नाही, ही बाब जिल्हा शल्य चिकित्सक व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून नातेवाईकांनी केला. मात्र, संपर्क झाला नाही. काही वेळानंतर गायत्रीचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक सतप्त झाले आणि त्यांनी वार्डातील टेबल खुर्च्या व कांचाची तोडफोड केली.