डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:13 AM2021-04-28T04:13:58+5:302021-04-28T04:13:58+5:30
चिखलदरा : अपघातात जखमी झालेल्या इसमाला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यावर गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारार्थ अमरावती नेण्यासाठी रुग्णवाहिका न ...
चिखलदरा : अपघातात जखमी झालेल्या इसमाला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यावर गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारार्थ अमरावती नेण्यासाठी रुग्णवाहिका न दिल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टरविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे.
२६ एप्रिल रोजी रात्री गज्या सुखलाल मावस्कर (३०, रा. आकी मोरगड) या तरुणाचा अपघात झाला व त्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी टेम्ब्रुसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथील डॉ. चंदन पिंपरकर यांनी प्राथमिक उपचार करून रुग्णाला उपचारासाठी अमरावतीला हलविण्याचा सल्ला दिला. रुग्णाच्या नातेवाइकांनी शासकीय रुग्णवाहिकेची मागणी केली असता, ती मिळाली नाही. आमदार राजकुमार पटेल यांनी डॉ. पिंपरकर यांना फोन करून सेवा उपलब्ध करण्याची सूचना केली.
रात्री उशिरा रुग्णवाहिका मिळाल्यावर जखमी गज्या मावस्कर याला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर युवकाच्या मृत्यूला जबाबदार डॉ. पिंपरकर यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी आ. राजकुमार पटेल* यांनी केली आहे.
कोट
संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन चौकशीअंती संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.
सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा
कोट२
रुग्णावर उपचार सुरू होते. नातेवाइकांकडे वाहन असल्याने तुम्ही त्यात घेऊन जाता काय, असे विचारले. त्यांनी नकार देताच आरोग्य केंद्राचे वाहन देण्यात आले.
चंदन पिंपरकर, वैद्यकीय अधिकारी, टेम्ब्रुसोंडा