कर्ज ५० हजारांचे, सात-बारावर बोजा चढविला १ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:15 AM2021-04-28T04:15:22+5:302021-04-28T04:15:22+5:30
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील एका जमानतदार शेतकऱ्याच्या सात-बारावर चक्क १ लाख रुपयांचा बोजा चढविल्याचा प्रताप येथील ...
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील एका जमानतदार शेतकऱ्याच्या सात-बारावर चक्क १ लाख रुपयांचा बोजा चढविल्याचा प्रताप येथील तलाठी कार्यालयाने केला आहे. एका कर्ज प्रकरणात सदर शेतकरी केवळ जमानतदार असून, संबंधिताने बँकेकडून ५० हजारांचे कर्ज घेतले होते. ५० हजारांचे कर्ज असताना चक्क १ लाख रुपयाचा बोजा सात-बारावर चढविल्याने याबाबतचा संताप व्यक्त करीत सदर शेतकऱ्याने तहसीलदार यांच्याकडे तक्रार देऊन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. अमरावती येथील रहिवासी एका महिलेने महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळातून थेट कर्ज योजनेंतर्गत रेडिमेड गारमेंटकरिता ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी कामनापूर येथील रहिवासी विजय वासुदेव मुंडाले हे शेतकरी म्हणून जमानतदार होते. त्यामुळे मागासवर्गीय महामंडळाच्या सुचनेवरून तहसीलदार यांना विजय मुंडाले यांच्या सात-बारावर कर्जाचा बोजा चढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच सुचनेवरून भातकुली तहसीलदार यांनी तत्काळ कामनापूर तलाठी यांना पत्र देत बोजा चढविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे येथील तलाठी कार्यालयाने सात-बारावर किमान ५० ते ८५ हजार रुपयांपेक्षा कमी बोजा चढविणे अपेक्षित होते; परंतु येथील तलाठी कार्यालयाने या जमानतदार शेतकऱ्याच्या सात-बारावर चक्क एक लाख रुपयांचा बोजा चढविला आहे. सदरची चूक नजरचुकीने झाल्याची कबुलीदेखील तलाठी यांनी पत्राद्वारे दिली आहे; परंतु या चुकीमुळे सदर शेतकऱ्याला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याने यांनी याचा संताप व्यक्त करीत याबाबतची तक्रार भातकुली तहसीलदार यांच्याकडे केली असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
कोट
सदरचा प्रकार मला माहिती नाही, याबाबत मी विचारणा करून चौकशी करते.
निता लबडे, तहसीलदार.