डिसेंबरमध्ये मुंबई रेल्वे प्रवासात उडणार गोंधळ
By admin | Published: November 27, 2015 12:34 AM2015-11-27T00:34:29+5:302015-11-27T00:34:29+5:30
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमिवर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी राहणार आहे.
विशेष गाडी सोडण्याची मागणी : चैत्यभूमीवर ये- जा करणाऱ्यांची गर्दी
अमरावती : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमिवर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी राहणार आहे. त्यामुळे १ ते १० डिसेंबरदरम्यान मुंबई रेल्वे प्रवासात गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची व्यवस्था करावी, या आशयाची मागणी रिपाइंचे महानगर उपाध्यक्ष अशोक नंदागवळी यांनी केली आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, खासदार आनंदराव अडसूळ, मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाप्रबंधक, भुसावळ आणि नागपूर विभागाचे प्रबंधकांना निवेदन सादर करुन विदर्भातील आंबेडकरी अनुयायांची अभिवादनासाठी उसळणाऱ्या गर्दीबाबतची वस्तुस्थिती रिपाइंचे अशोक नंदागवळी यांनी मांडलीे. बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी महिला, पुरुषांसह आबालवृद्धाचाही समावेश राहतो. आंबेडकरी अनुयायांची या काळात होणाऱ्या गर्दीमुळे नियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ज्या प्रवाशांचे आरक्षण असताना त्यांना सुखरुप प्रवास करता येत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांची दादर येथील चैत्यभूमिवर होणारी गर्दी लक्षात घेता यंदा १ ते १० डिसेंबर या कालावधीत मुंबई ये- जा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची सोय करावी, असे नंदागवळी यांचे म्हणने आहे. नागपूर आणि अमरावती रेल्वे स्थानकावरुन या १० दिवसांच्या कालावधीत किमान चार विशेष गाड्या सोडल्या तर नियमीत प्रवाशांना त्रास होणार नाही. अन्यथा मुंबईकडे ये- जा करणाऱ्या प्रवाशांना १ ते १० डिसेंबर या कालावधीत प्रचंड त्रास घेवून प्रवास करावा लागेल. रेल्वे गाड्यात आरक्षण असताना नियमीत प्रवाशांना त्यांच्या आरक्षित जागेवर प्रवास करता येत नाही. (प्रतिनिधी)