श्रीनिवास रेड्डी यांच्या मर्जीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:13 AM2021-04-20T04:13:21+5:302021-04-20T04:13:21+5:30

अमरावती : हरिसाल येथील वनक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि टायगर फाऊंडेशन जोरदार चर्चेत ...

Decision on Srinivas Reddy's preferred contract staff today | श्रीनिवास रेड्डी यांच्या मर्जीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत आज निर्णय

श्रीनिवास रेड्डी यांच्या मर्जीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत आज निर्णय

Next

अमरावती : हरिसाल येथील वनक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि टायगर फाऊंडेशन जोरदार चर्चेत आले आहे. याप्रकरणी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या मर्जीतील १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत मंगळवार, २० एप्रिल रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रभारी क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण हे आढावा घेणार आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात विविध कामे करण्यासाठी टायगर फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. राज्यस्तरावर टायगर फाऊंडेशन समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे आहेत. या फाऊंडेशनमध्ये कंत्राटी पदांना दरवर्षी मान्यता देऊन मुदतवाढ दिली जाते. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत टायगर फाऊंडेशनमध्ये श्रीनिवास रेड्डी यांच्याच मर्जीतील १३ कंत्राटी भरण्यात आले आहेत. यात बहुतांश नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक भरणा आहे. दोन अभियंते, एक लिपिक, ईको टुरिझम, लाईव्ह हुड अंतर्गत रोजगार, गाईड प्रशिक्षक, ऑडिओ-व्हिडिओ तयार करणे, ग्राफिक डिझायनर अशी एकूण १३ पदे कंत्राटी आहेत. ही सर्व पदे दोन वर्षांपूर्वी रेड्डी यांनी मर्जीतील घेतल्याची ओरड आहे. हे कंत्राटी कर्मचारी नियमित वनकर्मचाऱ्यांना धाकात ठेवून प्रशासकीय कामे करतात, असा आक्षेप आहे. निविदा प्रक्रिया, प्रशासकीय कामांना मान्यता देणे, देयके अदा करणे, धनादेश वठविणे आदी कामेही रेड्डी यांच्या सांगण्यावरून हे कंत्राटी कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने करीत असल्याची माहिती आहे. १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी तिघांचा कार्यकाळ संपला असून, याविषयी मंगळवारी अंतिम निर्णय हाेण्याचे संकेत आहेत. यावर्षीचे आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपले असून, मे अथवा जूनमध्ये या कंत्राटी पदांना मुदतवाढ दिली जाते. त्यानुसार सीसीएफ चव्हाण यांनी आढावा बैठक बोलावली आहे.

-----------

काही कंत्राटींना शाल-श्रीफळ मिळणार?

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात विनोद शिवकुमार, एम.एस. रेड्डी यांच्या एककल्ली कारभाराला साथ देणाऱ्या १३ पैकी काही कंत्राटी कर्मचारी कमी केले जातील, अशी माहिती आहे. यात काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत सीसीएफ चव्हाण यांनी माहिती घेतली आहे. पण, रेड्डी यांचे विश्वासू कंत्राटी कर्मचाऱ्यांना शाल-श्रीफळ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबत वनविभागात तक्रारीचा ढीग आहे.

------------

टायगर क्राईम सेल, टायगर फाऊंडेशनमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामांचा मंगळवारी मुख्य वनसंरक्षक चव्हाण हे आढावा घेतील. त्यानुसार माहिती गोळा करण्याची तयारी चालविली आहे. तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पुन्हा कंत्राटी पदांना मुदतवाढ द्यावी अथवा नाही, हा अंतिम निर्णय सीसीएफ घेतील.

- मनोजकुमार खैरनार, विभागीय वनाधिकारी, टायगर क्राईम सेल.

Web Title: Decision on Srinivas Reddy's preferred contract staff today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.