पेपरफुटीप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यााच कुलगुरूंचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 08:51 PM2019-06-04T20:51:49+5:302019-06-04T20:51:58+5:30
अभियांत्रिकीचा पेपर फुटल्याचे प्रकरण 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी शाखेच्या मेकॅनिक्स विषयाचा पेपर फुटला. या प्रकरणात येत्या आठ दिवसांत पोलीस ठाण्यात फौजदारी दाखल करण्यात निर्णय कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मंगळवारी सिनेट सभेत स्पष्ट केला.
पेपरफूटप्रकरणी सिनेट सदस्य संतोष ठाकरे यांनी लक्षवेधी मांडली. या प्रकाराने विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला. पेपर कोणी फोडला, कोणते महाविद्यालय यात सहभागी आहेत, याची प्राथमिक चौकशी झाली आहे. विद्यापीठातील अस्थायी कर्मचारी आशिष राऊत याने मोबाइलवर प्रश्नपत्रिका वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कर्मचारी बोरे नामक याच्या मोबाइलवर पाठविला. ही बाब विद्यापीठ परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी चौकशीअंती समोर आणली आहे.
सिनेट सभेत मनीष गवई, भैयासाहेब मेटकर, विवेक देशमुख, रवींद्र मुंद्रे, प्रवीण रघुवंशी, भीमराव वाघमारे, संतोष वाघमारे या सदस्यांनी पोलिसांत फौजदारी दाखल करण्याची मागणी रेटून धरली. तथापि, विद्यापीठाने याप्रकरणी त्रिसदस्यीय समिती गठित केली असून, तो अहवाल आल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल, असे कुलगुरूंनी सांगितले. अहवाल नेमका कधीपर्यंत येणार, हे स्पष्ट करण्याची मागणी सिनेट सदस्यांनी केली. यादरम्यान कुलगुरू चांदेकर यांनी येत्या आठ दिवसांत चौकशी अहवाल प्राप्त होईल; त्यानंतर पोलिसांत दोषींविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केला जाईल, असे सिनेटमध्ये सांगितले.
‘लोकमत’चे मानले आभार
अभियांत्रिकीचा पेपर फुटल्याचे प्रकरण 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले. त्याद्वारे विद्यापीठात काय सुरु आहे, हे समोर आले. सिनेट सदस्य मनीष गवई यांनी त्याबद्दल 'लोकमत'चे आभार मानले.
रोजंदारी कर्मचारी वापरतो १२ लाखांचे वाहन
पेपरफूटप्रकरणी दोषी आढळलेला आशिष राऊत हा २६३ रुपये रोजंदारीवरील अस्थायी कर्मचारी होता. मात्र, तो १२ लाखांचे वाहन वापरत होता, ही बाब विद्यापीठाला का दिसली नाही, असा सवाल सिनेट सदस्यांनी उपस्थित केला. पेपरफूटप्रकरणी चार ते पाच ठिकाणी व्यवहार झाला. त्यामुळे सत्यता बाहेर काढण्यासाठी हे प्रकरण पोलिसांत विनाविलंब दिले पाहिजे, असेही सदस्य म्हणाले.
परीक्षा संचालकांनी सांगितला पेपरफुटीचा प्रवास
विद्यापीठ परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी सिनेट सभेत पेपरफुटीचा प्रवास उलगडला. १६ ते २९ मे दरम्यान या विषयाचा पाठपुरावा त्यांनी केला. ४५ मिनिटे अगोदर पेपर लीक कसा झाला, कोणाच्या मोबाइलवर हा प्रकार घडला, याची माहिती घेण्यात आली. आशिष राऊत याचा मोबाइल जप्त करण्यात आला. वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयात हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी दोन अस्थायी कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहे. मोबाइलमध्ये चार प्रश्नपत्रिका आढळल्या असल्याची माहिती हेमंत देशमुख यांनी दिली.
पेपरफूटप्रकरणी दोषींविरुद्ध पोलिसांत फौजदारी दाखल करण्यात येईल. समितीचा अहवाल आल्यानंतर आठ दिवसांत हे प्रकरण पोलिसांत देऊ.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ