पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाने निकाल घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:14 AM2021-03-08T04:14:05+5:302021-03-08T04:14:05+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित व्हावे, अशी मागणी ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित व्हावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे.
मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनापासून उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये बंद आहे. मध्यंतरी कोरोना ओसरत असताना, शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व कनिष्ठ महाविद्यालय पुन्हा बंद करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांचे अंतर्गत मूल्यमापन करून प्राप्त गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात यावे आणि शैक्षणिक वर्ष २०२० -२१ चा निकाल घोषित करण्यात यावा तसेच पुढील शैक्षणिक वर्ष जून २०२१ पासून सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शिक्षक, कर्मचारी हे कोरोना संक्रमणकाळातही अध्ययन, अध्यापनाचे कामकाज करीत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ तत्त्वावर ऑनलाईन अध्यापन आणि शालेय कामकाज करण्याची परवानगी मिळावी, अशा मागणीचे निवेदन प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, संभाजी रेवाळे, मनीष काळे, राजेश सावरकर, महिला आघाडी प्रमुख सरीता काठोळे, योगिता जिरापुरे, सुषमा वानखडे, भावना ठाकरे, प्रवीणा कोल्हे यांनी दिले आहे.
०००००००००००००००००००००००००