अमरावती विद्यापीठाच्या संशोधन कामगिरीत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:50 AM2020-07-28T11:50:23+5:302020-07-28T11:50:46+5:30
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देणे ही मोठी जबाबदारी विद्यापीठाची आहे. परंतु, या महत्त्वाच्या बाबीकडे अमरावती विद्यापीठ माघारल्याचे वास्तव आहे.
बेव ऑफ सायन्सचा डेटा : पाच वर्षात केवळ २९८ संशोधन पेपर प्रसिद्ध, वरिष्ठांकडून संशोधनाकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची संशोधन कामगिरी(रिसर्च परफॉर्मन्स) कमालीची घसरली आहे. नॅक, यूजीसीच्या गाईड लाईनुसार नव संशोधनाला प्राधान्य देणे अनिवार्य आहे. तथापि, सन २०१६ ते जुलै २०२० या पाच वर्षात केवळ २९८ संशोधन पेपर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसा अहवाल 'बेव ऑफ सायन्सने डेटा' स्वरुपात जारी केला आहे. राज्यात अन्य विद्यापीठाच्या तुलनेत संशोधन कार्यात अमरावती विद्यापीठाची कामगिरी फार उत्तम नसल्याचे दिसून येते.
विद्यापीठ म्हटले की, उच्च शिक्षण, पीएचडी, एमफिल, पदव्युत्तर शिक्षणासह नव संशोधनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. समाजाभिमुख संशोधन करून ते देशाच्या विकासाचे आधारस्तंभ होतील, अशी अपेक्षा विद्यापीठाचा कारभार हाताळणारे उच्च विद्याविभूषित अधिकारी, पदव्युत्तर विभाग प्रमुखांकडून आहे. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देणे ही मोठी जबाबदारी विद्यापीठाची आहे. परंतु, या महत्त्वाच्या बाबीकडे अमरावती विद्यापीठ माघारल्याचे वास्तव आहे. सन २०१६ ते २०१९ पर्यंत संशोधन शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित आहे. चांगल्या दर्जाचे संशोधन पेपर प्रसिद्ध करण्यासाठी विद्यापीठाकडून फारशे प्रयत्न होत नाही. विद्यापीठात महत्त्वाच्या जागी आसनस्थ अधिकाऱ्यांची संशोधन कामगिरी नगण्य आहे. नव संशोधकांना पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी ठोस प्रयत्न करण्यात आले नाही, अशा विविध बाबींमुळे विद्यापीठाचे रिसर्च परफॉर्मन्स घसरले, असे तज्ञ्जाचे मत आहे.
अशी आहे पाच वर्षात संशोधन कामगिरी
बेव ऑफ सायन्सच्या डेटानुसार सन २०१६ ते जुलै २०२० दरम्यान अमरावती विद्यापीठाने २९८ संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहे. यात २०१६ मध्ये १०१, २०१७- ७०, २०१८- ६३, २०१९- ४० तर जुलै २०२० मध्ये २४ संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहे. विद्यापीठाने सन २०१५ पूर्वी संशोधनात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
गत तीन वर्षांत विद्यापीठाला तीन पेटेंट नवीन मिळाले आहे. त्यापैकी एक पेटेंट कमर्शिअल करार झाला आहे. लोणार येथील संशोधनाची जबाबदारी मिळाली असून, राजीव गांधी सायन्स इंन्टिट्यूटसोबत संशोधनाचे काम करणार आहे. नव्याने संशोधनाचे काम वाढले आहे.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ