आरएमसी प्लांटची परवानगी नाकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:10 PM2018-01-07T23:10:25+5:302018-01-07T23:10:48+5:30
शहरातून जाणारा पांढुर्णा-मोर्शी या राज्य महामार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
वरूड : शहरातून जाणारा पांढुर्णा-मोर्शी या राज्य महामार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी एचजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वरूड शहरात आरएमसी प्लांट उभारला आहे. या प्लांटला प्रदूषण नियंत्रण मंडळाने भेट देऊन परवानगी नाकरली. यासंदर्भातील पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहाळकर यांनी तहसीलदार आशिष बिजवल यांना दिले आहे.
अमरावती रस्त्यावर मिक्स प्लांट टाकताना प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली नसल्याची तक्रार करण्यात आली होती. यावरून १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी आरएमसी प्लांटला भेट दिली. त्यानंतर तो अहवाल तहसीलदारांना पाठविला. या अहवालानुसार वरूड येथे अमरावती मार्गावर एचजी इन्फ्रास्टक्चर कंपनीने आरएसी प्लांट सुरू केला आहे. तथापी जल (प्रतिबंधक व नियंत्रण) कायदा १९७४ नुसार संमत्तीपत्र घेणे बंधनकारक असूनही कंपनीने प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी किंवा संमतीपत्र घेतले नाही.
श्वसनाचे आजार वाढले
कोणतीही परवानगी न घेता हा प्लांट सुरू केला. या प्लांटवर तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावर करावाई करीत परवानगी नाकारावी, अशा सूचना केली आहे. नागपूर महामार्ग ते पांढुर्णापर्यंतच्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. यासाठी खोदकाम सुरू आहे. रस्त्यावर दगड माती व धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे श्वसणाचे आजार वाढले आहेत. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सचिन अंजीकर यांनी तक्रार केली होती.
एचजीच्या व्यवस्थापकांना पत्र
तहसीलदारांना प्रदूषण मंडळाने दिलेल्या पत्राची एक प्रत एचजी इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या प्लँट व्यवस्थापकांना दिले आहे. यात जल कायदा १९७४ ब हवा कायदा १९८१ अन्वये संमतीपत्र घेणे बंधनकारक आहे. पत्र प्राप्त होताच सात दिवसात आॅनलाइन अप्लिकेशन करण्याच्या सूचना केल्या आहेत.