इर्विन रेल्वे स्टेशन रोडवर आढळला कुजलेला मृतदेह; दुचाकीची चावी, मोबाईल आढळला
By प्रदीप भाकरे | Published: January 13, 2024 03:19 PM2024-01-13T15:19:19+5:302024-01-13T16:01:52+5:30
घातपाताच्या शक्यतेने तपासाला गती
अमरावती: इर्विन ते रेल्वे स्टेशन रोडवरील एका दुचाकी शोरूमलेतच्या पडक्या इमारतीत २५ ते ३० वर्षे वयोगटातील तरूणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार उघड झाला.
सवगेश नवलेश पवार (वय २५ ते ३० वर्ष, रा. राजुरा बेडा) अशी मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आहे. घटनास्थळाहून मिळालेली दुचाकीची चावी व मोबाईलवरून मृताची ओळख पटविण्यात कोतवाली पोलिसांना यश आले. सकाळच्या सुमारास अत्यंत दुर्गंधी येऊ लागल्याने नजिकच्या व्यक्तींनी लगतच्या अत्यंत शिकस्त इमारतीत जाऊन पाहिले. तो कुजकट वास तेथून येत असल्याने काहींनी आत जाऊन पाहिुले असता तेथे एका तरूणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत दिसून आला. त्याबाबत शहर कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली.
ठसेतज्ञांसह फॉरेन्सिकची टिमला पाचारण
सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे, कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे व गुन्हे शाखा प्रमुख आसाराम चोरमले यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. तथा पाहणी केली. मृतदेहाच्या पंचनाम्यासाठी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या तज्ञांसह ठसेतज्ञांना देखील पाचारण करण्यात आले. त्यानंतर मृताची ओळख पटविण्यात आली. याप्रकरणी प्रथमदर्शनी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यादुष्टीने पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे. ओळख पटताच मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी इर्विनच्या शवागारात धाडण्यात आला. तेथे शनिवारी दुपारनंतर शवविच्छेदन करण्यात आले.
फ्रेजरपुरात मिसिंग दाखल
मागील सहा सात दिवसांपासून सवगेश पवार हा घरातून बेपत्ता असल्याची तक्रार १२ जानेवारी रोजी फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविण्यात आली. सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान ती तक्रार नोंदविल्यानंतर फ्रेजरपुरा पोलिसांसह शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा शोध घेण्यात येत होता.