पश्चिम विदर्भात ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत घट; सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 04:33 PM2018-10-25T16:33:32+5:302018-10-25T16:33:46+5:30
यंदा सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाने विभागातील ३५ तालुक्यांमध्ये भूजलात १० फुटांपर्यंत घट व २१ तालुक्यांत वाढ नोंदविण्यात आली आहे.
अमरावती : यंदा सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाने विभागातील ३५ तालुक्यांमध्ये भूजलात १० फुटांपर्यंत घट व २१ तालुक्यांत वाढ नोंदविण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने याकरिता आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ६८० निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या. यावरून किती गावांमध्ये पाणीटंचाई राहणार, याचा अहवाल शासनाला या आठवड्यात सादर होईल.
यंदाच्या पावसाळ्यात अमरावती विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ७७८ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ८५ आहे. अकोला व वाशिम जिल्ह्याने सरासरी पार केली असली तरी अमरावती जिल्ह्यात ७७ टक्के, यवतमाळ ७८, व बुलडाणा जिल्ह्यात ६९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये भूजलाचे पुनर्भरण झालेलेच नाही. मात्र, २१ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत वाढ झाल्याचे निरीक्षण विहिरीतील स्थिर पाणीपातळीच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, विभागातील ५६ पैकी आठ तालुक्यांमध्ये एक मीटरपर्यंत, १९ तालुक्यांमध्ये दोन मीटरपर्यंत, सात तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत तसेच एका तालुक्यात तीन मीटरपेक्षा जास्त तूट आलेली आहे. जिल्हानिहाय अमरावती जिल्ह्यात १२, अकोला जिल्ह्यात सात, वाशिम जिल्ह्यात एक, बुलडाणा जिल्ह्यात १३, तर यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांतील भूजलात तूट नोंदविली गेली.
यवतमाळात सर्वाधिक १४ तालुक्यातील भूजलात वाढ
अमरावती विभागात २१ तालुक्यांतील भूजलात वाढ झाल्याने रबी हंगामाचा दिलासा शेतकºयांना मिळाला आहे. यामध्ये एक मीटरपर्यंत नऊ तालुके, दोन मीटरपर्यंत आठ, तीन मीटरपर्यंत तीन, तर एका तालुक्यात तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात वाढ झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात दोन तालुक्यांमध्ये, वाशिम जिल्ह्यात पाच, तर यवतमाळ जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे निरीक्षण विहिरींच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
बसाल्ट खडकाने भूगर्भात पाणीसाठवण क्षमता घटली
विभागाची भूगर्भीय स्थिती पाहता, किमान ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण या खडकाने व्यापला आहे. यात पाणीसाठवण क्षमता कमी आहे; मात्र यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने थोडीफार साठवण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्र्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भूजलात रूपांतर होणे महत्त्वाचे आहे. मात्र, सिंचन, औद्योगिक वापर, शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी यामुळे या साठ्यातून भूजलाचा वारेमाप उपसा होत आहे.