पश्चिम विदर्भात ४९ तालुक्यांतील भूजलात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:27 AM2019-04-30T11:27:05+5:302019-04-30T11:28:18+5:30
मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे.
गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांत एक मीटरपर्यंत पाणी पातळीत वाढ झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा नोंदविण्यात आले.
भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा अमरावती विभागातील ६७१ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पाणी पातळीचे निरीक्षण मार्च अखेर नोंदविण्यात आले व पाच वर्षांतील मार्च महिन्याच्या पाणी पातळीची तुलनात्मक स्थिती नोंदविण्यात आली. विभागातील भूजलाची धक्कादायक नोंद समोर आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वच म्हणजेच १४ तालुक्यांतील भूजलात घट झालेली आहे. अकोला जिल्ह्यात सर्वच सात तालुक्यांत, वाशिम जिल्ह्यात सहा, बुलडाणा जिल्ह्यात १३ तर यवतमाळ जिल्ह्यात १६ पैकी ९ तालुक्यांतील भूजलात घट होत असल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. यामध्ये अमरावती व अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी २ तालुक्यात ४ ते ६ मीटरपर्यंत, अमरावती जिल्ह्यातील २ व अकोला जिल्ह्यात १ तालुक्यात २ ते ३ मीटरपर्यंत तूट आलेली आहे.
विभागातील २९ तालुक्यांत १ ते २ मीटरपर्यंत तूट आलेली आहे. यामध्ये अमरावती ८, अकोला २, वाशिम ४, बुलडाणा ५ व यवतमाळ जिल्ह्यातील २ तालुके आहेत. तसेच २१ तालुक्यांत एक मीटरपर्यंत तूट आलेली आहे. यामध्ये ेअमरावती जिल्ह्यात २, अकोला जिल्ह्यात २, वाशिम जिल्ह्यात २, बुलडाणा ८, व यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश आहे. भूजलस्तर झपाट्याने कमी होत असल्याने या तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे.
अमरावती विभागातील ५०२ जलाशयांत १६ टक्के साठा
अमरावती विभागात मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ५०२ प्रकल्प आहेत. यामध्ये सध्या ५३१.८२ दलघमी म्हणजेच १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये ९ मुख्य प्रकल्पांत २७६ दलघमी म्हणजेच १८ टक्के, २४ मध्यम प्रकल्पात १४२ दलघमी म्हणजेच २१ टक्के, तर ४६९ लघु प्रकल्पांत ११३ दलघमी म्हणजेच १० टक्के साठा शिल्लक आहे. सध्या असणारे ४५ ते ४६ अंश तापमानामुळे जलाशयातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. या प्रकल्पांमध्ये ५ ते ८ टक्क््यांपर्यंत मृतसाठा असल्याने अर्धेअधिक प्रकल्प सध्याच कोरडे पडले आहे.