११८ दिवसांनी पॉझिटिव्हिटीत कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:12+5:302021-05-31T04:10:12+5:30
अमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारीपासून असलेल्या कोरोनाच्या लाटेत नोंद झालेल्या ५६ टक्के पाॅझिटिव्हिटीनंतर शनिवारी सर्वांत कमी ५.६६ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद ...
अमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारीपासून असलेल्या कोरोनाच्या लाटेत नोंद झालेल्या ५६ टक्के पाॅझिटिव्हिटीनंतर शनिवारी सर्वांत कमी ५.६६ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. चाचण्यांची संख्या वाढती असल्याने सध्या रुग्णसंख्या चारशेच्या घरात आहे. मात्र, दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता जिल्हाभरात माघारल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. यामध्ये महापालिका क्षेत्रात मार्च महिन्याच्या अखेरीस संसर्ग आटोक्यात आला. मात्र, ग्रामीणमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला. यामध्ये वरुड, अचलपूर, मोर्शी, धारणी, अंजनगाव सुर्जी व तिवसा तालुक्यांत मोठ्या प्रमाणात संक्रमितांची नोंद झालेली आहे. किंबहुना या तालुक्यातील काही गावे कोरोनाची क्लस्टर म्हणून नोंद झालेली आहेत. या सर्व ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोन व चाचण्या वाढविण्यात आल्यानंतर आता काही प्रमाणात संसर्ग कमी झालेला आहे.
जिल्ह्यात कोरोनाची संसर्गाची सुरुवात ४ एप्रिलला झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४५ हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. विशेष ग्रामीण भागातील संसर्ग हा दिवाळीपश्चात वाढू लागला. ५२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर ग्रामीणमध्ये कोरोनाचा ग्राफ वाढला. किंबहुना यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आली व जिल्हा सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेश तसेच नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, आदी जिल्ह्यांत संसर्ग वाढल्यानंतर तेथील रुग्ण अमरावती जिल्ह्यात उपचारार्थ आले व सोबत त्यांचे नातेवाईकही आले. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, डबल म्युटंट व्हेरिएंट, आदी प्रकारांमुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला व तब्बल चार महिन्यांनी कोरोनाची दुसरी लाट आता कोठे आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
पाईंटर
पॉझिटिव्हिटीची जिल्हास्थिती (टक्के)
दिनांक पाॅझिटिव्ह पॉझिटिव्हिटी
२५ मे ५४२ १५.३७
२६ मे ५२८ ८.६७
२७ मे ४५५ ७.४७
२८ मे ४९६ ६.७७
२९ मे ४०४ ५.६६
बॉक्स
जानेवारीपासून ७१,६६२ संक्रमितांची नोंद
जिल्ह्यात १ जानेवारीला कोरोनाग्रस्तांची संख्या १९,७६८ होती, आता २९ मे रोजी ९१,४३० रुग्णांची नोंद या कालावधीत झालेली आहे म्हणजेच ७१,६६२ रुग्ण या काळात वाढले. याशिवाय १,०४३ मृत्यू व ६४,९८८ रुग्ण संक्रमनमुक्त झाले असल्याचा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा अहवाल आहे.
बॉक्स
११.१२ लाख कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
जिल्ह्यात २४ मेपर्यंत हाय रिस्कच्या ३,६९,२३५ व लो रिस्कच्या ७,४२,८९४ व्यक्ती, अशा एकूण ११ लाख १२ हजार १२९ जणांची नोंद घेण्यात येऊन आवश्यकतेप्रमाणे त्यांचे स्राव घेण्यात आले व काहींना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे हे प्रमाण १२.५७ टक्के असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
२,१९३ कंटेन्मेंट नीरस्त
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ३१९ ॲक्टिव्ह व २,५६५ कंटेन्मेंट झोन आहेत. याशिवाय २,१९३ कंटेन्मेंट झोन नीरस्त करण्यात आलेले आहेत. या काळात ३७२ पथकांद्वारा सर्व्हे करण्यात आला व साधारणपणे १४ हजार नमुने घेण्यात आलेले आहेत. यामध्ये ६,५१८ संक्रमित रुग्णांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.