Deepali Chavan Suicide Case : अखेर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 02:55 PM2021-03-30T14:55:22+5:302021-03-30T14:59:10+5:30
Deepali Chavan Suicide Case : अखेर मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष बाब म्हणून रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले.
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यावेळी रेड्डी यांच्या निलंबनाचा मुद्दा रेटून धरला. अखेर मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष बाब म्हणून रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले.
Deepali Chavan Suicide : आरोपी विनोद शिवकुमार बाला यांच्या पोलीस कोठडीत वाढ
हरीसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी गुगामाल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार बाला याला अटक केल्यानंतर तीन दिवसांचा पीसीआर मिळाला होता. पीसीआर संपल्यानतर सोमवारी त्याला पुन्हा कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला प्रथम न्यायाधीशानी 30 मार्चपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राप्तमाहितीनुसार, दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी वरिष्ठांकडून विशेष महिला पोलीस अधिकारी मोर्शीच्या उपविभागीय अधिकारी पूनम पाटील यांच्याकडे रविवारी तपास सोपविल्यानंतर आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, एपीआय वर्षा खरसान, पीएस आय सुयोग महापुरे, पोलीस कर्मचारी अनिल झारेकर, अरविंद सरोदे यांनी कडक पोलीस बंदोबस्तात पुन्हा सोमवारी दुपारी दीड वाजता न्यायालय धारणी येथे हजर केले असता, प्रथम न्यायाधीश एम.एस. गाडे यांनी त्याला एक दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावल्याने आरोपी विनोद शिवकुमार बाला हा 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे.
चिखलदरा निवस्थानाहून दस्तऐवज केले जप्त; कार्यालयीन कमरचाऱ्यांचे बयान नोंदविले
गुगामाल वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार बाला याला रविवारी दुपारी 2 वाजता दरम्यान चिखलदऱ्यातील त्याच्या कार्यालयात व शासकीय निवासस्थानी नेण्यात आले होते. तेथे त्याच्याकडून लॅपटॉप, पेन ड्रॉइव्ह आणि शासकीय दस्तऐवज जप्त केले. तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांचे बयाण पोलिसांकडून नोंदविण्यात आले आहे.
मध्यरात्री बोलावण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी
आरोपी विनोद शिवकुमार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हया कर्तव्यावर असताना त्यांना मध्यरात्री जंगलात बोलावत होता, तर कित्येक वेळा त्यांना त्याने जंगलातून फोटो सेल्फी काढून पाठवायला सांगितले होते. ते त्यांनी सुसाईड मध्ये नमूद केले. त्या कारणाने त्याला पोलीसानी जंगलातील त्या घटनास्थवर नेले होते.