दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन खात्याच्या समितीनेच दडविला अहवाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:23+5:302021-07-10T04:10:23+5:30

नऊ सदस्यीय समिती कागदोपत्रीच, तीन महिन्यांचा कालावधीनंतर अहवाल सादर नाही अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण ...

Deepali Chavan suicide case: Forest department committee hides report? | दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन खात्याच्या समितीनेच दडविला अहवाल?

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन खात्याच्या समितीनेच दडविला अहवाल?

Next

नऊ सदस्यीय समिती कागदोपत्रीच, तीन महिन्यांचा कालावधीनंतर अहवाल सादर नाही

अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन खात्याच्या समितीनेच अहवाल दडविल्याची धक्कादायक माहिती आहे. एका समितीच्या तीन उपसमित्या गठित करुनही वस्तुनिष्ठ अहवाल न देणे ही बाब शंका उपस्थित करणारी आहे.

राज्याच्या वन खात्याचे वनबल प्रमुख पी. साईप्रसाद यांच्या पुढाकाराने नऊ सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले हाेते. या समितीला अहवाल सादरीकरणासाठी दोन महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, हल्ली तीन महिने ओलांडले असताना या समितीने वन बलप्रमुखांकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला नाही. या समितीत असलेले आयएफएस अधिकारी हे निलंबित अपर

प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक़ विनोद शिवकुमार यांना पुरेपूर वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. या समितीने हरिसाल येथील घटनास्थळी भेट दिली. वन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. विशेषत: महिला वन कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. दीपाली यांचे पती राजेश माेहिते यांचे बयाण नोंदविले. आरोपी एम.एम. रेड्डी, विनोद शिवकुमार यांच्या वागणुकीबाबत हकिकत जाणून घेतली.

असे असताना समिती अहवाल सादर करण्यास विलंब का लावत आहे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. आयएफएस लॉबीच्या दबावतंत्राखाली ही वन खात्याची समिती असून, वनबलप्रमुख याबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याची वनविभागात जोरदार चर्चा रंगत आहे. याविषयी वन खात्याचे वनबल प्रमुख पी. साईप्रसाद यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

-------------------

पोलिसांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी धारणी पोलिसांनी अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटी, शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. तर मुख्य आराेपी निलंबित उपवनसंरक्षक़ विनोद शिवकुमार हा येथील मध्यवर्ती कारागृहात जेरबंद आहे. काही दिवसांपूर्वीच विनोद शिवकुमार याचा अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला, हे विशेष.

---------------

अशी आहे वन खात्याची चौकशी समिती

वन खात्याने दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी चौाकशीसाठी नऊ सदस्यांची समिती गठीत केली होती. यात समितीचे अध्यक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव, सहअध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा (अय्यर) त्रिवेदी, मेळघाटच्या विभागीय वन अधिकारी पियूषा जगताप, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विजया कोकाटे, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी किशोर मिस्त्रीकोटकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण व स्थानिक स्वयंसेवी संस्थेचा सदस्याचा समावेश आहे. या समितीच्या तीन उपसमिती गठीत करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य शासनाने गठीत केलेल्या आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे.

Web Title: Deepali Chavan suicide case: Forest department committee hides report?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.