मृग बहराचे ‘डिस्टन्सिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 05:00 AM2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:11+5:30
संत्राउत्पादक जिल्ह्याच्या १४ तालुक्यांतील एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक २० हजार हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यापैकी बहुतांश क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. चार वर्षांपासून अपेक्षित उत्पन्नाला मुकलेल्या आणि दुष्काळाने होरपळलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांना निदान यावर्षी तरी सुगीची अपेक्षा होती.
देवेंद्र धोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
बेनोडा शहीद : मे महिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे संत्राबागांचा ताण तुटल्याने आणि वरून पूर्वमोसमी पाऊस आल्याने आस लावून बसलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांचा यावर्षी भ्रमनिरास झाला. मृग बहरानेही कोरोनाकाळात ‘डिस्टन्सिंग’ पाळत हुलकावणी दिल्याने जवळपास ९० ते ९५ टक्के क्षेत्रातील संत्राबागा बहराविना आहेत.
संत्राउत्पादक जिल्ह्याच्या १४ तालुक्यांतील एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक २० हजार हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यापैकी बहुतांश क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. चार वर्षांपासून अपेक्षित उत्पन्नाला मुकलेल्या आणि दुष्काळाने होरपळलेल्या संत्राउत्पादक शेतकऱ्यांना निदान यावर्षी तरी सुगीची अपेक्षा होती. गतवर्षीच्या हंगामात शेवटच्या टप्प्यात लॉकडाऊनमुळे थोडे फार नुकसान झाले तरीही कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’युक्त संत्राफळे प्रकाशझोतात आली. बाजारात वाढलेल्या मागणीमुळे उत्पन्नात भर पडेल, असा शेतकºयांना अंदाज होता. मात्र, ऐनवेळी बहराने हुलकावणी दिल्याने चिंतेचे सावट पसरले आहे.
बहराच्या काळात दरवर्षी साधारणपणे दीड ते दोन हजार रुपये प्रतिहजार दराने व्यापारी सौदे करतात. यंदा मृग बहराचे उत्पादन अत्यल्प झाल्याने यावर्षी अभूतपूर्व बाजारभाव मिळत आहे. प्रतिहजार ४५०० रुपये दराने व्यापाºयांनी संत्री खरेदी केली. बळीराजा सांगेल तो दर द्यायला व्यापारी तयार असला तरी बागेत फळेच नाहीत. यामुळे ‘देव आला द्यायला, पण पदर नाही घ्यायला’ अशी शेतकºयांची परिस्थिती झाली आहे.
चार वर्षांत नापिकीमुळे कफल्लक झालेल्या संत्राउत्पादक शेतकºयांना यावर्षीच्या नियोजन खर्चाची चिंता सतावत आहे.
निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या संत्राउत्पादक शेतकºयांच्या मृग बहरात न आलेल्या संत्राबागांचे सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
- रमेश जिचकार, संचालक, महाराष्ट्र राज्य संत्राउत्पादक संघ
यावर्षी चांगल्या भाव आहेत. मुबलक संत्री असती, तर चार वर्षात झालेले नुकसान भरून निघाले असते. आता चालू वर्षाचे व्यवस्थापन अशक्य आहे.
- देवेंद्र ढोरे
संत्राउत्पादक, बेनोडा शहीद