मृग कोरडा पेरण्या थबकल्या
By admin | Published: June 21, 2017 12:03 AM2017-06-21T00:03:37+5:302017-06-21T00:03:37+5:30
पेरणीपूर्व मशागत झाल्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना यंदाही पावसाने दगा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पेरणीपूर्व मशागत झाल्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना यंदाही पावसाने दगा दिला. ८ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेले आहे. मृगाचा मेंढा बेभरवशाचा ठरल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण मदार आता बुधवारपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रावर आहे. या नक्षत्राचे वाहन म्हैस असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात २० जूनपर्यंत ९२.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६२.१ मिमी पाऊस पडला. ही ६७.२ टक्केवारी आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी उपयोगी नाही. मात्र, या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. यंदा मृगात भरपूर पाऊस पडणार अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांना मेंढ्याने धोका दिला. त्यामुळे २१ जूनपासून सुरु होणाऱ्या आर्द्रा नक्षत्राकडे शेतकरी मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. यानक्षत्राचे वाहन देखील म्हैस असल्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस या नक्षत्रात पडण्याची अपेक्षा आहे. पावसाअभावी पेरण्या थबकल्याने आर्द्रा नक्षत्रातच जिल्ह्याच्या पेरण्या होण्याची शक्यता आहे. किंबहुना मागील पाच वर्षांत चार वेळा मृग नक्षत्रात पावसाने दगा दिला आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत यंदाच्या पेरण्या लांबणार आहे. पावसाची दडी अधिक काळ राहिल्यास ६० दिवस इतक्या कमी दिवसांचे मूग, उडीद आदी क्षेत्र कमी होऊन हे क्षेत्र कापूस, सोयाबीनमध्ये रूपांतरीत होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार ११२ हेक्टर पेरणीक्षेत्र आहे. यामध्ये सोयाबीनसाठी दोन लाख ७० हजार हेक्टर, कापसासाठी दोन लाख १० हजार हेक्टर,
धूळवाफ पेरणी धोक्यात
अमरावती : तूर एक लाख ३० हजार हेक्टर, मूग ३३ हजार हेक्टर, ज्वारी २८ हजार हेक्टर, उडीद ३० हजार हेक्टर, धान २५०० हेक्टर, या व्यतिरिक्त इतर पिकांसाठी २४ हजार ६१२ हेक्टरक्षेत्राचे नियोजन आहे. यंदा एप्रिल व मे महिन्यात उष्णतेची लाट होती. याचा थेट परिणाम धूळवाफ पेरणीवर झाला. संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या तीन हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली असली तरी विहिरींची पातळी खोल जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.
आता आर्द्रावर मदार : मेंढा दगाबाज, म्हशीवर भिस्त
तुरीचे चुकारे नाहीत, पीककर्जही नाही
गतवर्षीच्या हंगामात सोयाबीन हमीभावाच्या वर कधी सरकलेच नाही. तुरीचे उत्पादन समाधानकारक झाले. मात्र, खुल्या बाजारात भाव पडले. नाफेडला विकलेल्या तुरीचे दोन महिन्यापूर्वीचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही. थकीत असल्याने पीक कर्जाचे वाटप नाही.तात्पूरत्या स्वरूपात १० हजाराचे कर्जही मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे व खते उपलब्ध करावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
अशी आहे मान्सूनची स्थिती
राजस्थान ते बंगालच्या उपसागरादरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती, हिमालय ते बंगालचा उपसागर आणि सिक्कीमवर चक्राकार वारे, राजस्थान ते लगतच्या परिसरात चक्राकार वारे व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने मान्सूनला गती येण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.
७० ते १०० मिमी पाऊस हवा
पेरणीसाठी किमान ७० ते १०० मिमी पावसाची गरज आहे. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत १०० टक्के, भारी जमिनीत ७० टक्के पावसाची गरज असून पाऊस पडेपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
गुरूवारनंतर सार्वत्रिक पाऊस
दोन दिवसांपासून पावसाचा खंड आहे. त्यापूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला.२० व २१ जूनला अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा व तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २२ जूनला बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम व २३ जूनला जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ञ अनिल बंड यांनी लोकमतला सांगितले.
मागिल वर्षी
५३ दिवस
मागिल हंगामात जून ते आॅक्टोबरमध्ये ८७८ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी १०८ आहे. पावसाळ्यात ५३ दिवस पाऊस पडला. मान्सूनचे १८ जूनला आगमन होऊन ११ दिवसांत १५० मिमी पाऊस पडला होता.