शिकस्त बांधकाम पाडले; दोन वर्षानंतर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:19 AM2021-08-17T04:19:02+5:302021-08-17T04:19:02+5:30
अमरावती : महापालिकेच्या पथकाने दोन वर्षांपूर्वी शिकस्त बांधकाम पाडल्याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिसांनी चौघांसह महापालिका, पोलीस व ...
अमरावती : महापालिकेच्या पथकाने दोन वर्षांपूर्वी शिकस्त बांधकाम पाडल्याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिसांनी चौघांसह महापालिका, पोलीस व १० ते १५ मजुरांविरूद्ध भादंविचे कलम ३७९, १२० अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये शाम पिंजानी (६५, मधुबन काॅलनी), रोहित भागचंद बजाज (३०, लुला लेन, रामपुरी कॅम्प), रमेश खत्रू (५८, कंवरनगर), प्रकाश आडतिया (६९, बच्छराज प्लॉट), हरीश बजाज (४६, रामपुरी कॅम्प), घटनास्थळावर उपस्थित महापालिका कर्मचारी, पोलीस व मजुरांचा समावेश आहे.
जवाहर रोडवरील प्रकाश कॅप ॲन्ड होजियारी डेपो या जागेचा हा वाद आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून, पहिल्या मजल्यावरील काही जागा त्यांच्या वडिलांच्या नावे भाडेकरू म्हणून होती. ती इमारत अतिशिकस्त प्रवर्गात मोडत असून, ती तोडत असल्याबाबत महापालिकेने फिर्यादी महिलेसह पाच आरोपींनादेखील नोटीस दिली होती. २७ ऑगस्ट २०१९ रोजी ती इमारत पाडण्याची कारवाई करण्यात आली. फिर्यादी ही तिच्या मुलासह घटनास्थळी पोहोचली. त्यावेळी फिर्यादीची भाड्याची इमारत पाडण्याची कारवाई सुरू होती. तेथील सातपैकी पाच खोल्या पूर्णत: तोडण्यात आल्या. अन्य खोलीतील सुमारे १० ते १२ लाख रुपये किमतीचे सामान तेथे आढळून आले नाही. सर्व आरोपींनी कट रचून ते साहित्य चोरून नेल्याची तक्रार त्यांनी जेएमएफसी न्यायालयात केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार, शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक ज्ञनेश्वर कायंदे करीत आहेत.