सदोष वेतननिश्चितीने लाखोंचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:30 PM2018-04-10T23:30:57+5:302018-04-10T23:31:10+5:30
महापालिका आस्थापनेवरील अनेक अधिकारी- कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती चुकीची झाल्याने प्रशासनाला लाखोंचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे धक्कादायक निरीक्षण स्थानिक निधी लेखा संचालनालयाच्या लेखापरीक्षकांनी नोंदविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका आस्थापनेवरील अनेक अधिकारी- कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती चुकीची झाल्याने प्रशासनाला लाखोंचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे धक्कादायक निरीक्षण स्थानिक निधी लेखा संचालनालयाच्या लेखापरीक्षकांनी नोंदविले आहे. अतिरिक्त वेतन, वेतनवृद्धी यावरही आक्षेप नोंदविले असून, फरकाची ती रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
औरंगाबाद स्थित स्थानिक निधी लेखा संचालनालयाचे त्रिसदस्यीय पथकाकडून महापालिकेत २०१३-१४ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण सुरू आहे. लेखापरीक्षकांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका तपासल्या. अनेकांची वेतननिश्चिती चुकीच्या पद्धतीने केली असल्याने संबंधितांना अतिरिक्त, वाढीव वेतन देण्यात आले. यात तूर्तास मोठ्या पदांचा प्रभार सांभाळणारे अधिकारीही समाविष्ट आहेत. वेतनातील वाढ लक्षात आल्यानंतरही संबंधितांनी सामान्य प्रशासन विभाग वा लेखा विभागाकडे तक्रार केली नाही, असा आक्षेपही लेखापरीक्षकांनी नोंदविला तसेच अतिरिक्त वेतन, आगाऊ वेतनवृद्धी व वेतनातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. सेवापुस्तिकांची तपासणी पूर्ण व्हायची असल्याने किती जणांची वेतननिश्चिती चुकीची व अतिरिक्त वेतनाची रक्कम स्पष्ट होऊ शकलेली नाही.
रकमेचे संबंधितांकडून समायोजन करण्यात यावे, असा लेखाआक्षेप लेखापरीक्षकांनी घेतला आहे. लेखापरीक्षकांनी सामान्य प्रशासन विभागाला समायोजनाचे आदेश दिल्याने अधीक्षक दुर्गदास मिसाळ यांच्या नेतृत्वातील एक चमू त्यासाठी काम करीत आहे. २०११ पासून प्रत्येक वर्षी सेवापुस्तिकांमधील त्रुटींंवर आक्षेप घेतले जात असताना, २०१८ पर्यंतही त्या त्रुटींची सुधारणा होऊ नये, ही महापालिकेची प्रशासकीय लेटलतिफीवरही कोरडे ओढले गेले आहेत.
चुकांचा भडिमार
आगाऊ वेतनवाढ देय नसताना झालेले अतिप्रदान, चुकीची वेतननिश्चिती, मूळ वेतनापेक्षा कमी वा जादा वेतन अदायगी, वेतनश्रेणीतील तफावत, ज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देणे यावरही औरंगाबादच्या आॅडिटरने आक्षेप घेतले आहेत. हे सर्व आक्षेप २०१३-१४ चा आर्थिक वर्षातील असल्याची माहिती जीएडीने दिली.
औरंगाबाद स्थित स्थानिक निधी लेखासंचालनालयाच्या लेखापरीक्षकांकडून सेवा पुस्तिकांचे निरीक्षण सुरू आहे. त्यांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार सेवापुस्तिकांचे अपडेशन सुरू करण्यात आले आहे.
- महेश देशमुख
उपायुक्त, प्रशासन