९० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता
By admin | Published: February 26, 2017 12:02 AM2017-02-26T00:02:41+5:302017-02-26T00:02:41+5:30
सकस आहाराची कमतरता, धकधकीचे जीवन, आरोग्य समस्यांडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे ९० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण असल्याचे ...
ग्रामीण भागात वाढला टक्का : औषधी घेण्याकडे महिलांची उदासीनता
अमरावती : सकस आहाराची कमतरता, धकधकीचे जीवन, आरोग्य समस्यांडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे ९० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. ग्रामीण भागात या प्रमाणाचा टक्का अधिक आहे.
शासकीय रुग्णालयात मोफत औषधांची सोय असूनही, महिला औषधी घेण्यास पुढे येत नाहीत. यामुळे समस्यांमध्ये भर पडत आहे. यामध्ये थायरॉईडचे प्रमाण मात्र कमी आहे. केवळ तीन टक्के महिलाच या आजाराने त्रस्त आहेत. कुटुंबाचा गाडा हाकताना महिलांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. जेवणेवेळेवर न करणे ही अनेक महिलांना सवय आहे. जेवण करताना देखील शिळे अन्न टाकून द्यायची त्यांची इच्छा होत नाही, महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हिमोग्लोबीनचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते.
गर्भवतींमध्ये प्रमाण अधिक
अमरावती : महिलांमध्ये किमान १२ टक्क्याचे प्रमाण आवश्यक आहे. परंतु, सध्या हे प्रमाण ७ ते ८ टक्क्यांवरच आले आहे. त्यामुळे प्रसूतीच्यावेळी रक्तदाब वाढून रुग्णाच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. त्यामुळे प्रसूतीकाळात महिलांनी खाण-पानावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
बाळाला थायरॉईडचा धोका
जिल्ह्यातील ३ टक्के महिला थायरॉईडने ग्रस्त आहेत. वयाच्या तिशीनंतर होणारा हा आजार आता १० ते १२ वर्षांतदेखील होऊ लागला आहे. शरीरातील आयोडीनचे प्रमाण कमी झाल्यास तो उद्भवतो. अशा रुग्णांचे वजन वाढणे, मानसिक आजार होणे, केस पिकणे, लहान मुली लवकर वयात येणे आदी लक्षणे दिसतात. गर्भधारणेच्या वेळी आईला थायरॉईडचा आजार असल्यास तो बाळालाही होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.
घरच्यांची काळजी घेण्याच्या व्यापात महिला स्त:कडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हिमोग्लोबीन कमी होणे आदी समस्या उद्भवतात. हिमोग्लोबीन वाढण्यासाठी औषधी घेण्यासोबतच सकस आहार घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे.
- अंजली देशमुख, स्त्रीरोग तज्ज्ञ