रेल्वेत चोरीसाठी चोरट्यांच्या सीमा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:39 PM2018-07-29T22:39:08+5:302018-07-29T22:39:44+5:30

रेल्वे गाड्यांत चोरी करण्यासाठी चोरट्यांनी आपल्या सीमा निश्चित केल्यात, हे वाचून जरा आश्चर्य होईल. पण, ते खरे आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या आशीर्वादाने हा प्रकार बिनधास्तपणे सुरू असून, रेल्वे गाड्यांत आतापर्यंत झालेल्या घटनांत एकही चोरी उघडकीस आणण्याचे धाडस रेल्वे पोलिसांनी दाखविले नाही, हे विशेष.

Definition of thieves for theft on railway | रेल्वेत चोरीसाठी चोरट्यांच्या सीमा निश्चित

रेल्वेत चोरीसाठी चोरट्यांच्या सीमा निश्चित

Next
ठळक मुद्देमोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ : नवख्या टोळीकडून चोरीचे धाडस, रेल्वे पोलीस अनभिज्ञ
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे गाड्यांत चोरी करण्यासाठी चोरट्यांनी आपल्या सीमा निश्चित केल्यात, हे वाचून जरा आश्चर्य होईल. पण, ते खरे आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या आशीर्वादाने हा प्रकार बिनधास्तपणे सुरू असून, रेल्वे गाड्यांत आतापर्यंत झालेल्या घटनांत एकही चोरी उघडकीस आणण्याचे धाडस रेल्वे पोलिसांनी दाखविले नाही, हे विशेष.
रेल्वे गाड्यात हल्ली रेल्वे प्रवास असुरक्षित झाला आहे. रेल्वे पोलीस नेमके कसे कर्तव्य बजावतात, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. रेल्वेची मालमत्ता, प्रवासी सुरक्षिततेसाठी प्रशासनाने बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. मात्र, धावत्या गाड्यांमध्ये चेन स्नेचिंग, साहित्यांची चोरी, मोबाईल चोरी, उचलेगिरीचे प्रकार हे नित्याचीच बाब आहे. नवजीवन एक्सप्रेसने गांजा तस्करी होत असल्याचे सर्वश्रूत असूनही रेल्वे पोलीस ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा कारभार करीत आहे. गांजा कोण, कोठून, कसा आणतो, याची इत्थंभूत माहिती रेल्वे पोलिसांना असताना ठोस कारवाई का नाही? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. बडनेरासह अकोला, वर्धा, पुलगाव येथील नवख्या चोरट्यांनी रेल्वे गाड्यांना लक्ष केले आहे. यात काही बालकांचाही समावेश असल्याची माहिती आहे. बडनेरा ते अकोला आणि बडनेरा ते वर्धा, अकोला ते भुसावळ, वर्धा ते नागपूर असे चोरट्यांनी रेल्वे गाड्यात चोरींसाठी स्वत:हून सीमा आखून घेतल्या आहेत. चोरट्यांच्या या सीमेबद्दल रेल्वे पोलीस अवगत आहे. मात्र, त्यांना चोरट्यांकडून ‘रसद’ मिळत असल्याने ‘ते’ सुद्धा चुप्पी साधून आहेत. पोलिसांच्या अभयानेच चोरटे प्लॅटफार्मवरून रेल्वे गाड्यात ‘अंजाम’ देण्यासाठी प्रवास करतात. सहा महिन्यांत बडनेरा रेल्वे स्थानकावर गाडी सुरू होताच चेन स्नेचिंगचा चार घटना घडल्या आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसात तक्रारादेखील झाल्यात.
मोबाईल चोरीसाठी नवख्या टोळीचे पदार्पण
रेल्वे गाड्यात प्रवाशांकडील महागडे मोबाईल क्षणात उडविण्याची किमया करणारे नवख्या टोळीने पदार्पण केले आहे. १२ ते २५ वयोगटातील काही युवकांसह बालकांचाही यात समावेश असल्याची माहिती आहे. प्रवाशाकडील साहित्य चोरी करण्यात त्यांचा हातखंडा असून, मोबाईल चोरण्यास ते पटाईत आहे. मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने वाढ होत असताना रेल्वे पोलिसांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
चोरीच्या घटनांची पोलिसात तक्रार नोंदविली जात नाही
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. रेल्वेत ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची घटना घडते, त्याबाबत दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्याद नोंदविणे कठीण जाते. अशातच प्रवासी हे बाहेरील असल्याने ते आपल्याकडील साहित्य, कुटुंबीयांना सोडून पोलिसात तक्रार नोंदविण्यास जाऊ शकत नाही. त्यामुळे रेल्वे गाड्यांत अनेक चोरीच्या घटना घडूनदेखील तक्रारीअभावी पोलिसात नोंद केली जात नाही. त्यामुळे रेल्वे गाड्यांत चोरीच्या घटनांमध्ये नियमित वाढ होत आहे. याला आळा घालणे गरजेचे झाले आहे.

रेल्वे स्थानकाच्या सीमेवर चोरट्यांवर पाळत ठेवण्यासाठी साध्या पोषाखात पोलीस तैनात करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एक मोबाईल चोर पडकला असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. चोरीची तक्रार प्राप्त होताच त्या दिशेने तपास करून चोरट्यांना जेरबंद केले जाते.
- पी. व्ही. चक्रे, पोलीस निरीक्षक, बडनेरा रेल्वे

Web Title: Definition of thieves for theft on railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.