शासन निर्णयाला ठेंगा, मुख्यालय सोडून 'एसीएफ'चा अमरावतीत ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:08 IST2025-01-13T11:07:50+5:302025-01-13T11:08:18+5:30

Amravati : मुख्य वनसंरक्षकांचे अभय; गौण खनिज तस्करीत वाढ

Defying government decision, ACF leaves headquarters and stays in Amravati | शासन निर्णयाला ठेंगा, मुख्यालय सोडून 'एसीएफ'चा अमरावतीत ठिय्या

Defying government decision, ACF leaves headquarters and stays in Amravati

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
राज्याच्या वन विभागाने मोर्शी, वरूड या दोन वनपरिक्षेत्राकरिता स्वतंत्रपणे सहायक वनसंरक्षकांची नियुक्ती केली असून, मुख्यालय हे मोर्शी निश्चित करण्यात आले आहे. असे असताना सहायक वनसंरक्षक डॉ. मयूर भैलुमे हे मुख्यालयात कर्तव्य न बजावता त्यांनी अमरावती येथे ठिय्या मांडला आहे. हा प्रकार शासन निर्णयाची पायमल्ली करणारा असतानासुद्धा वरिष्ठांकडून एसीएफ डॉ. भैलुमे यांना अभय मिळत असल्याचे चित्र आहे.


राज्याच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव द. ल. थोरात यांच्या स्वाक्षरीने १५ जानेवारी २०१५ रोजी सहायक वनसंरक्षकांच्या कार्यक्षेत्रातील बदल निश्चित करण्याबाबत शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार मोर्शी, वरूड या वनपरिक्षेत्राकरिता सहायक वनसंरक्षक (कॅम्पा व वन्यजीव) यांची नियुक्ती करून मोर्शी हे मुख्यालय ठरविले आहे, तर महसूल विभागाच्या धर्तीवर वन विभागात उपवनविभाग, तसेच त्यांचे कार्यक्षेत्र व मुख्यालय निश्चित करून सहायक वनसंरक्षकांना 'कार्यालय प्रमुख' म्हणून घोषित करून ३ सप्टेंबर २०१४ रोजी उपसचिव नं. मा. शीलवंत यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.


राज्यातील २२६ सहायक वनसंरक्षकांचे कार्यक्षेत्र आणि मुख्यालय शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आले असताना एकमात्र मोर्शी मुख्यालयाचे सहायक वनसंरक्षक डॉ. मयूर भैलुमे यास अपवाद ठरले आहे. वरिष्ठांना काही तरी वेगळे कौटुंबिक कारण सांगून डॉ. भैलुमे यांनी अमरावतीत बस्तान मांडण्याची शक्कल लढविली आहे. त्यांच्या या नियमबाह्य प्रकाराला अमरावती प्रादेशिकच्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यादेखील 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' असे म्हणून मूक संमती देत आहेत. 


गौण खनिज, वन तस्करीला जबाबदार कोण? 
गेल्या चार महिन्यांपासून सहायक वनसंरक्षक डॉ. मयूर भैलुमे हे मोर्शीऐवजी अमरावती येथून कारभार हाकत आहेत. या चार महिन्यांच्या कालावधीत मोर्शी, वरूडमध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिज, वन तस्करीला उधाण आले आहे. राखीव जंगलातून नदी, नाले, ओढ्यातून वाळू तस्करी होत आहे. वरूड येथील वन नाक्याहून सागवान तस्करी होत आहे. तर बाजारात खुलेआम वन्यजिवांसह मांस विक्री ही नित्याचीच बाब झाली आहे. सहायक वनसंरक्षक मुख्यालयी राहत नसल्याने मोर्शी, वरूड वनपरिक्षेत्रात असे गंभीर प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.


"सहायक वनसंरक्षकांनी मुख्यालयी राहूनच कर्तव्य बजवावे, असे शासनाला अपेक्षित आहे. मात्र, डॉ. मयूर भैलुमे हे मोर्शी ऐवजी अमरावतीतून कारभार हाकत असतील तर हा नियमबाह्य प्रकार खपवून घेणार नाही. येत्या दोन दिवसांत या प्रकरणाची शहानिशा करून तसे आदेश दिले जातील." 
- एम. श्रीनिवास राव प्रधान मुख्य वनसंरक्षक (दुय्यम संवर्ग कार्मिक)

Web Title: Defying government decision, ACF leaves headquarters and stays in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.