३४ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाई वाटपात दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:12 AM2021-03-06T04:12:30+5:302021-03-06T04:12:30+5:30
मोर्शी : महाआघाडी सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार ...
मोर्शी : महाआघाडी सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपयांची मदत उपलब्ध करून आधार दिला. तथापि, तालुक्यातील ३७ हजार ९६० शेतकऱ्यांच्या ४० हजार ५४० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आजही मोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी या नुकसानभरपाई मदतीपासून वंचित आहेत.
मोर्शी तालुक्यात ४ सप्टेंबर २०१९ रोजी अतिवृष्टीने पडझड झालेल्या घर पुनर्बांधणी व दुरुस्तीकरिता ४६ लक्ष ४९ हजार ६६० रुपये निधी प्राप्त झाला होता. मात्र, तो निधी ३१ मार्च २०२० रोजी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व्यपगत होऊन शासनाकडे परत गेला. शेतकरी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असताना, तहसीलदार मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन आल्यापावली परत करीत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तहसीलदारांप्रति प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या मदतीपासून वंचित राहिलेल्या लाभार्थींना परत गेलेला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रूपेश वाळके यांनी सांगितले.