गुन्हा दाखल करण्यास विलंब, ठाणेदारावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 06:00 AM2019-12-18T06:00:00+5:302019-12-18T06:00:33+5:30
मारहाणीमुळे अनेक जखमा झालेल्या या माय-लेकी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. देशभरात लैंगिक अत्याचार आणि त्यानंतरच्या क्रौर्याच्या घटना ताज्या असताना, अमरावत२ी ग्रामीण हद्दीत माय-लेकींनी सामूहिक बलात्काराची दाखल केलेली तक्रार आणि टाळाटाळीनंतर पोलिसांनी नोंदविलेले गुन्हे, ही घटना समाजमनाचे लक्ष वेधणारी ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लैंगिक अत्याचारपीडित माय-लेकींनी वारंवार तक्रार दिल्यानंतरही अंजनगाव सुर्जी पोलिसांनी तब्बल ५० दिवस दखल घेतली नाही. 'तक्रार का दिली?' या मुद्यावरून आरोपींनी घरात शिरून पाय मोडेपर्यंत अमानुष मारहाण केली. कर्तव्यात दिरंगाई व कसूर करणाऱ्या ठाणेदारांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित आई व मुलीने 'लोकमत'शी बोलताना केली.
मारहाणीमुळे अनेक जखमा झालेल्या या माय-लेकी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. देशभरात लैंगिक अत्याचार आणि त्यानंतरच्या क्रौर्याच्या घटना ताज्या असताना, अमरावत२ी ग्रामीण हद्दीत माय-लेकींनी सामूहिक बलात्काराची दाखल केलेली तक्रार आणि टाळाटाळीनंतर पोलिसांनी नोंदविलेले गुन्हे, ही घटना समाजमनाचे लक्ष वेधणारी ठरली आहे.
पीडितांची आपबीती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पीडितांनी सांगितलेल्या आपबीतीनुसार, २६ आॅक्टोबरला रोजी रात्रीच्या सुमारास दहा जणांनी आळीपाळीने माय-लेकींवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची लेखी तक्रार पीडितांनी २७ च्या सकाळी अंजनगाव सुर्जी पोलिसांत केली. मात्र, पोलिसांनी तक्रार स्वीकारली नाही. उलट दमदाटी करून काढून दिले. वरिष्ठांकडे न जाण्यासाठीही धमकावले. त्यानंतरही ७ नोव्हेंबरला अमरावती येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक नव्हते. उपस्थित कुण्या एका अधिकाºयाला अत्याचाराची माहिती दिली. त्यांनी अंजनगावच्या ठाणेदाराला फोन केला. वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे निर्देश दिले. ११ नोव्हेंबर रोजी अंजनगाव पोलिसांना लेखी तक्रार दिली. ती स्वीकारली. 'रिसिव्ह्ड कॉपी' दिली जात नव्हती. मागे लागून ती मिळविली. वैद्यकीय तपासणीसाठी नेले; परंतु बलात्कारासंबंधी वैद्यकीय तपासणी केली नाही. १८ नोव्हेंबर रोजी ठाणेदाराची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाºयाकडे केली. तथापि, कारवाई झाली नाही.
दरम्यान, आरोपींनी तक्रार परत घेण्यास दबाव टाकला. आम्ही नकार दिला. १२ डिसेंबर रोजी आरोपींनी अचानक घरात शिरून मोबाईल फोडला. पाय मोडेपर्यंत मुलीच्या पायावर काठ्यांचे प्रहार करण्यात आले. दोघींचेही केस धरून दूरपर्यंत फरफटत नेले. रस्त्यावरचा चिखल माय-लेकींच्या तोंडात कोंबला. चेहºयालाही तो चिखल फासला. हे घडत असताना पीडितेचा भाऊ प्रतिकार करण्यासाठी धावला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली. मोडलेल्या पायाने पीडिता आणि तिची आई दुपारच्या सुमारास एसपी कार्यालयात पोहोचल्या. मात्र, एसपी नव्हते. एका अधिकाºयाच्या सांगण्यावरून दोघींनी सायंकाळी अंजनगाव ठाणे गाठले. पोलिसांनी मध्यरात्रीपर्यंत ताटकळत ठेवले. उद्या (१३) घरून वैद्यकीय तपासणीसाठी नेऊ, असे सांगून परत पाठविले. १३ डिसेंबर रोजी पोलीस आले नाही. त्यामुळे पीडितांनी स्वत:च १४ डिसेंबरला जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. १५ डिसेंबरला अंजनगाव पोलिसांनी बयान नोंदविले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी तक्रार मायलेकींची आहे. आताही त्या उपचार घेत आहेत.
भावासह पीडित महिला, मुलीवर गुन्हा दाखल
शहापुरातील सरिता धनंजय गायगोले यांनी अंजनगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. शेजारी राहणाºया अंकिता ढेंगे यांचे एका महिलेशी वाद सुरू होते. त्यांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, महिला, तिची मुलगी व मुलाने डोक्याचे केस ओढले आणि हाताला चावा घेऊन मारहाण केल्याचे गायगोले यांनी तक्रारीत म्हटले आहे. दुसरी तक्रार एका २५ वर्षीय मुलीने नोंदविली. घरी एकटी असताना, २१ वर्षीय तरुण घरी आला आणि पोलिसांत तक्रार का दिली, या कारणावरून मारहाण करून विनयभंग केल्याचे मुलीने तक्रारीत नमूद केले आहे. या दोन्ही तक्रारींवरून पोलिसांनी पीडित महिला, मुलगी व तिच्या भावाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. मात्र, यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी (एमएस) यांच्याशी चर्चा करून माहिती देता येईल.
- मोनाली कळंबे, मेडिकल आॅफिसर, जिल्हा स्त्री रुग्णालय.
आयजी मकरंद रानडे म्हणतात,
एसपींनाच विचारा!
प्रकरणाचे स्वरुप गंभीर आहे. पोलिसांची भूमिका नेमकी काय, याबाबत अस्पष्टता आहे. प्रकरण खोटे असल्याचे वक्तव्य ठाणेदाराने यापूर्वी केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही त्याच आशयाच्या प्रतिक्रिया माध्यमांना दिल्यात. असे असतानाही ५० दिवसांनी बलात्काराचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश खुद्द एसपींनीच दिले. आरोपी पसार आहेत. तक्रारकर्त्या होमगार्डच्या सुरक्षेत इस्पितळात उपचारार्थ दाखल आहेत. त्यामुळे या एकूणच प्रकरणाबाबत पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्याशी संवाद साधला असता, या प्रकरणाबाबत आपणास काहीच माहिती नाही आणि काय ते एसपींनाच विचारा, अशा शब्दांत त्यांनी भूमिका मांडली.
एसपी म्हणतात, जागा व्यर्थ दवडू नका!
गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणारे जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांना पीडितेने केलेले आरोप आणि एकूणच घटनेबाबत माहिती विचारली असता वृत्तपत्रांतील जागा व्यर्थ घालवू नका, अशी त्यांची प्रतिक्रिया होती.
ठाणेदार उपलब्धच होईना!
पीडितेच्या आरोपांबाबत अंजनगाव सुर्जी येथील ठाणेदार राजेश राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अमरावती कार्यालयातून वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ‘लोकमत’च्या स्थानिक प्रतिनिधीने पोलीस ठाणे गाठले; तथापि बराच वेळ प्रतीक्षा करूनही ठाणेदार ठाण्यातच पोहोचले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी त्यांची बाजू काय, हे कळू शकले नाही.
पीडितेला पुरेशी सुरक्षा आहे काय?
अंजनगाव सुर्जीतील या पीडित माय-लेकी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये दाखल होत्या. त्यांना सोमवारी पेइंग वॉर्डमध्ये हलविण्यात आले. त्यांच्या सुरक्षेसाठी एक पुरुष व एक महिला होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. मात्र, एकही पोलीस कर्मचारी तेथे तैनात करण्यात आलेला नाही. या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तक्रारीचे गांभीर्य बघता, पीडितांना असलेली सुरक्षा पुरेशी आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो.