विद्यापीठात पुनर्मूल्यांकन निकालास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:31 AM2019-08-31T01:31:51+5:302019-08-31T01:32:21+5:30

उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे.

Delay in reevaluation results at university | विद्यापीठात पुनर्मूल्यांकन निकालास विलंब

विद्यापीठात पुनर्मूल्यांकन निकालास विलंब

Next
ठळक मुद्देप्रवेशाबाबत विद्यार्थी चिंतीत : आधी नापास, नंतर पास; परीक्षा शुल्काचा भार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र, कालावधीपेक्षा अधिक अवधी झाला असताना पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम प्रवेशाची चिंता सतावू लागली आहे.
उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची नियमावली आहे. थोडा विलंब झाला की विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारून पुनर्मूल्यांकनाचे अर्ज घेतले जातात. असे असताना विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन होण्यास बराच वेळ लागत असल्याची ओरड विद्यार्थ्यांसह पालकांची आहे. अगोदरच परीक्षेचे निकाल विलंबाने जाहीर करण्यात आले. आता पुनर्मूल्यांकनास विलंब लागत असल्याने पुढील अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल अथवा नाही, याबाबत विद्यार्थी चिंतातूर झाले आहेत. मलकापूर तालुक्यातील काही विद्यार्थ्यांना बी.कॉम. प्रथम वर्षात पहिल्या सेमिस्टरच्या इंग्रजी विषयात नापास करण्यात आले होते. मात्र, पुनर्मूल्यांकनात याच विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळाले असून, ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाचा आर्थिक भार विद्यार्थ्यांना नाहकपणे सोसावा लागत आहे. उन्हाळी परीक्षेत झालेल्या मूल्यांकनात अनेक त्रुटी असल्याचे पुढे आले आहे. अमरावती विभागातील यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून पुनर्मूल्यांकनाच्या निकालाबाबत तोडगा निघत नसल्याची ओरड आहे.
निकालानंतर १० दिवसांत घेता येईल प्रवेश
पुनर्मूल्यांकनाचे ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर १० दिवसांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, ही बाब विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केली आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. तशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

Web Title: Delay in reevaluation results at university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.