आर्त किंकाळ्या अन् प्रचंड वेदनेच्या गराड्यात सुखाची झुळुक; जळीत वाॅर्डात उपचार घेणाऱ्या महिलेची प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2023 10:55 PM2023-11-04T22:55:06+5:302023-11-04T22:57:49+5:30
फुगे-फुलांच्या सजावटीत नामकरण सोहळा
- मनीष तसरे
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील जळीत वॉर्ड नको रे बाबा, अशी सर्वसामान्य प्रतिक्रिया असते. कारण जळालेल्यांच्या आर्त किंकाळ्या आणि प्रचंड वेदनांचा हुंकार येथे भरलेला असतो. शनिवारी मात्र या वॉर्डाचे रूपडे पालटले होते. रांगोळी, फुलांची सजावट, फुग्यांचे डेकाेरेशनने संपूर्ण वाॅर्ड सजविण्यात आला होता. उपचार घेत असलेल्या महिला रुग्णाच्या प्रसूतीनंतर तिच्या बाळाचा नामकरण सोहळा येथे पार पडला.
मेळघाटातील धारणी तालुक्यातील गर्भवती बबली उइके ( ३०) ही ३ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास जळीत वाॅर्डात दाखल झाली. अपघातामध्ये दुचाकीच्या गरम सायलेन्सरखाली हात भाजून तिला मोठी जखम झाली होती. तिला अचलपूर येथून बेशुद्धावस्थेमध्येच येथे आणण्यात आले होते. निरक्षर बबलीला पोटात वाढत असलेला गर्भ किती महिन्यांचा, हेदेखील डॉक्टरांना सांगता येत नव्हते. त्याच दिवशी अचानक तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. परंतु, इर्विनमध्ये प्रसूती विभाग नसल्याने तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु, तिची अवघडलेली स्थिती पाहता रात्रपाळीच्या परिचारिका सरोज कराळे आणि सकाळ पाळीच्या रूपाली राऊत यांनी या वाॅर्डातच तिची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. बबलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
बबलीच्या हाताची जखम खोलवर असल्याने तब्बल एक महिना ती रुग्णालयातच भरती होती. त्यामुळे प्रमुख मेट्रन मनीषा कांबळे, नंदा पाढेण, कविता धांडे, विद्या भुसारे यांनी तिच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी वॉर्डाची साजसज्जा केली. नावसुद्धा तुम्हीच ठेवा, असा आग्रह बबलीने केला. तिची प्रसूती रूपाली यांनी केल्याने बाळाचे नाव 'रूपवीर' ठेवण्यात आले. या नामकरण विधीला सीएस डॉ. दिलीप सौदळे, एसीएस प्रमोद निरवणे, डॉ. आशिष भोगे, फिजिशियन डॉ. प्रीती मोरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संध्या खराते, डॉ. सोनाली शिरभाते, डॉ. माला बनसोड, डॉ. देशमुख, सहायक अधिसेविका ललिता अटाळकर, ममता बांगड तसेच चतुर्थ कर्मचारी कन्हैया तेजी, उमेश कच्छवार, गजानन तर्हेकर, भोला पासरे हेदेखील उपस्थित होते. वॉर्डात शनिवारी सकाळपासून वेगळेच वातावरण होते. परिचारिकांपैकी कुणाच्या हाती पेढ्याचा डबा, कुणी खेळण्याच्या वस्तू, तर कुणी बाळासाठी व मातेसाठी कपडे आणले होते. येथे दाखल असलेल्या इतर रुग्णांसाठी हा सोहळा सुखद अनुभूती देऊन गेला.