‘डेल्टा’ व्हेरियंटने कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा, तूर्त वेळेतच मानधन अन् नोकरीचा धोकाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:35+5:302021-06-28T04:10:35+5:30

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कंत्राटींना दिली ५ जुलैची ‘डेडलाईन‘ अमरावती : कोरोनाच्या ‘डेल्टा’ व्हेरियंट या नव्या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने ...

'Delta' variant offers relief to contract workers, no immediate risk of remuneration or jobs | ‘डेल्टा’ व्हेरियंटने कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा, तूर्त वेळेतच मानधन अन् नोकरीचा धोकाही नाही

‘डेल्टा’ व्हेरियंटने कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा, तूर्त वेळेतच मानधन अन् नोकरीचा धोकाही नाही

Next

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कंत्राटींना दिली ५ जुलैची ‘डेडलाईन‘

अमरावती : कोरोनाच्या ‘डेल्टा’ व्हेरियंट या नव्या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोविड- १९ साठी नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ५ जुलै रोजी नोकरी जाणार ही भीती जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांना होती. पण, आता माेठा दिलासा मानला जात आहे.

अमरावती येथील सुपर स्पेशालिटी, जिल्हा सामान्य रूग्णालय, ग्रामीण रुग्णालय यासह कोविड रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हाभरात ११२५ कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरताच २५० कंत्राटी कर्मचारी कमी करण्यात आले होते. मात्र, दुसरी लाट येताच ३२५ कंत्राटी कर्मचारी निवडीद्धारे मानधनावर घेण्यात आले. यात कंत्राटी कर्मचारी हे एजन्सीमर्फत घेण्यात आले आहे. बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांनंतर पुन्हा नव्याने कंत्राट नूतनीकरण करण्यात येते. राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेच्या निधीतून कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाते.

-----------------

जिल्ह्यात किती कंत्राटी कर्मचारी घेतले

८२५

३२५

-----------

नंतर किती जणांना कमी केले

२५०

५८

-------------

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या कामावर असलेले कर्मचारी

११५०

----------------

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीचा तूर्त धोका नाही

कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, असे वरिष्ठांचे निर्देश आहे. ‘डेल्टा’ व्हेरियंट हा संसर्ग धोकादायक असल्याने जागतिक आराेग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तूर्त कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा प्रश्नच नाही. वेळेवर मानधन देण्यात येत असून, यासंदर्भात कोणाचीही तक्रार नाही.

- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक

-------------------

काही महिने बेरोजगारीचे संकट टळले

कोरोना संसर्गाचे रूग्ण कमी होत असताना कोविड रुग्णालयातून कंत्राटी कर्मचारी कमी करणार, ही चर्चा सुरू होती. ५ जुलैनंतर काही कंत्राटींना नारळही दिले जाणार होते. मात्र, ‘डेल्टा’ व्हेरियंटने आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरी काही महिने सुरक्षित असेल.

- मंगला मनवर, कंत्राटी सफाई कर्मचारी

----------

कोरोना काळात जीव धोक्यात टाकून रुग्णसेवेला प्राधान्य दिले. रुग्णांची देखभाल, काळजी घेतली. त्यामुळे राज्य शासनाने विशेष बाब म्हणून कोविड १९ च्या कालावधीत नियुक्ती कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे. शिक्षण पात्रतेनुसार त्यांची जबाबदारी निश्चित करावी.

- आकाश पाटील, वॉर्ड बाॅय.

----------------

गत दीड वर्षापासून कोविड १९ च्या काळात अतिशय प्रामाणिकपणे कोरोना रुग्णांची सेवा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रूग्णसंख्या कमी होत असताना कंत्राटी कर्मचारी कमी होतील, असे संकेत होते. मात्र, आता काही महिने नोकरीचा धोका नाही, असे चित्र आहे.

- प्रदीप वानखडे, कंत्राटी कर्मचारी

Web Title: 'Delta' variant offers relief to contract workers, no immediate risk of remuneration or jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.