आदिवासीच्या मृत्यूस जबाबदार डॉक्टरविरुद्ध कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:28 AM2021-09-02T04:28:34+5:302021-09-02T04:28:34+5:30
परतवाडा : आदिवासी इसमाच्या मृत्यूस चौकशीत दोषी आढळूनसुद्धा कारवाई न करता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून अभय दिल्याने त्यांच्याविरुद्धच ...
परतवाडा : आदिवासी इसमाच्या मृत्यूस चौकशीत दोषी आढळूनसुद्धा कारवाई न करता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून अभय दिल्याने त्यांच्याविरुद्धच कारवाई करण्याची मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आरोग्यमंत्र्यांना लेखी तक्रारीद्वारे केली. यामुळे मेळघाटातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ एप्रिल रोजी गजा सुखलाल मावस्कर (३०, रा. आकी) अपघातात जखमी झाले होते त्यांना टेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असल्यामुळे डॉ. चंदन पिंपरकर यांनी योग्य उपचार न करता अमरावती येथे नेण्याचा सल्ला नातेवाइकांना दिला. परंतु, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची विनवणी करूनही सतत टाळाटाळ करण्यात आली. उलट रुग्णांच्या नातेवाइकांशी असभ्य वर्तन करत रुग्णवाहिका देण्यास नकार दिला.
प्रहारचे कार्यकर्ते रामजी सावरकर यांना ही बाब रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितली. सावरकर यांनी ताबडतोब आरोग्य केंद्रात पोहोचून डॉक्टरांना रुग्णवाहिका देण्याची विनंती केली. परंतु, त्यांच्याशीही अपमानास्पद वागणूक करण्यात आली. अखेर आमदार राजकुमार पटेल यांना हा प्रकार दूरध्वनीद्वारे सांगण्यात आला. त्यानंतर आमदारांनी सूचना देताच रग्णवाहिका उपलब्ध करून दिली, मात्र गजा मावस्कर यांचा जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला
बॉक्स
चौकशी समितीत डॉक्टर दोषी
आ. राजकुमार पटेल यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यावर अंजनगाव येथील डॉक्टरांची चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशीत डॉ. चंदन पिंपरकर दोषी आढळले. जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी डॉ पिंपळकरविरुद्ध निलंबन, पगारवाढ रोखण्यासारखे कारवाई करणे अपेक्षित असताना ताकीद देऊन सोडून देण्यात आले, अशी आमदारांची तक्रार आहे.
बॉक्स
डीएचओंची चौकशी करा
मेळघाटातील आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर सोडण्यात आली असल्याचा आरोप आ. पटेल यांनी आरोग्यमंत्र्यांकडे तक्रारीद्वारे केली. डीएचओ दिलीप रनमले यांच्या संपत्तीची चौकशी करून आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास देण्याची मागणी त्यांनी केली आहे.