एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या पॅथॉलॉजीत रक्त तपासणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:14 AM2021-05-20T04:14:22+5:302021-05-20T04:14:22+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार चांदूर बाजार : स्थानिक आरोग्यम् कोविड रुग्णालय प्रशासनाने एकाच दिवशी रक्ताची एकच चाचणी दोन वेगवेगळ्या पॅथॉलॉजीत ...
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
चांदूर बाजार : स्थानिक आरोग्यम् कोविड रुग्णालय प्रशासनाने एकाच दिवशी रक्ताची एकच चाचणी दोन वेगवेगळ्या पॅथॉलॉजीत करण्यासाठी भाग पाडले. या अफलातून कारभाराविषयी रुग्णाच्या नातेवाइकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
शहरातील आरोग्यम् कोविड रुग्णालय हे खासगी कोविड सेंटर काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. गत महिन्यात केंद्रीय आरोग्य पथकाने चांदूर बाजारातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली होती. रुग्णालयात पुरेशी आरोग्य सुविधा नसल्याने ते बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, सदर रुग्णालय सुरूच आहे. या आरोग्य केंद्राबाबत गेल्या काही दिवसांपासून निरनिराळ्या चर्चा व तक्रारी वाढू लागल्या आहेत.
स्थानिक नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याची आई कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याने त्यांना ८ मे रोजी येथे दाखल केले होते. पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नसल्याची तसेच रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याची तक्रार सदर रुग्णाच्या नातेवाइकाने केली आहे.
रुग्णालयात मुक्या प्राण्यांचा मुक्त संचार असतो. याविषयी सदर रुग्णाने व त्यांचा मुलाने डॉक्टरांना व संचालकांना वेळोवेळी सांगितले. रुग्णाकडून औषधोपचाराचा नावावर ३२ हजार रुपये उकळले, मात्र रुग्णाला बिल देण्यात आले नाही. याबाबत विचारणा करताच संचालकाने अरेरावी केल्याचा आरोप रुग्णाच्या मुलाने केला आहे. या गैरप्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना भगत यांना चौकशीचे आदेश दिले होते. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केल्याची माहिती ‘लोकमत’ला त्यांनी दिली.
दरम्यान, रुग्णालयाच्या संचालकांनी पोलिसांमार्फत रुग्णाच्या नातेवाइकांची चौकशी करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सदर पालिका कर्मचाऱ्याने केला आहे.
एवढेच नव्हे तर सदर नगरपालिकेच्या कर्मचार्याच्या आईचा रक्त चाचणीकरिता एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या पॅथॉलॉजीमध्ये नमुने पाठविले. यामुळे या रुग्णालयाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी रुग्णाचा नातेवाईक कडून केली जात आहे.
-------------------
वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोग्यम् कोविड रुग्णालयाची चौकशी करून अहवाल वरिष्ठ अधिकार्यांकडे सादर केला आहे. काही महत्वाचा सूचना आरोग्यम् कोविड रुग्णालयाच्या संचालकांना देण्यात आले आहे.
- ज्योत्स्ना भगत, तालुका आरोग्य अधिकारी