नागपुरातही धरणे, मुख्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Published: August 21, 2016 11:54 PM2016-08-21T23:54:49+5:302016-08-21T23:54:49+5:30
पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमातील शाळेत शिकणाऱ्या प्रथमेश सगणे या ११ वर्षाच्या विद्यार्थ्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संविधान चौकात घोषणा : मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमातील शाळेत शिकणाऱ्या प्रथमेश सगणे या ११ वर्षाच्या विद्यार्थ्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणामुळे सर्वत्र असंतोष खदखदत असून शंकर महाराज यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी लावून धरली आहे.
लहुजी शक्ती सेनेसह विविध सामाजिक संघटनांतर्फे रविवारी नागपूर येथील संविधान चौकात धरणे आंदोलन करून या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध संघटनांनी सदर मागणी रेटून धरली. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
नरबळी प्रकरणात वसतिगृह अधीक्षक दिलीप मौजे याला निलंबित करण्यात आले असले तरी आश्रम प्रमुखांना अटक होईस्तोवर आंदोलन सुरूच राहील, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
लहुजी शक्ती सेनेचे विदर्भाध्यक्ष रुपेश खडसे, महादेव जाधव, मातंग फाऊंडेशनचे रवींद्र खडसे, नत्थुजी अडागळे, शंकरराव वानखेडे, पंकज जाधव, उषा अडागळे, विजय बावणे, गुलाब ताकतोडे, लहानू इंगळे, फकिरा खडसे, गुरुदास बावणे, संजय ठोसर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.