परदेशात उच्च शिक्षणासाठी ‘ट्रान्सस्क्रीप्ट’ची मागणी घसरली
By गणेश वासनिक | Published: January 15, 2024 06:32 PM2024-01-15T18:32:23+5:302024-01-15T18:33:15+5:30
अमरावती विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थ्यांचा कल ओसरला, कोरोना काळानंतर संख्या सतत घटतेय
अमरावती: गेल्या काही वर्षात परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र २०२० मध्ये कोरोना आल्यानंतर आता परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण ओसरले आहे. विशेषत: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थ्यांचा कल ओसरला असून परदेशात शिक्षणासाठी आवश्यक ‘ट्रान्सस्क्रीप्ट’ प्रमाणपत्राच्या मागणीत घट झाली आहे.
देशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याच्या ट्रेण्ड होता. मात्र गत काही वर्षात परदेशात युद्धजन्य स्थिती, विद्यार्थ्यांविरोधात हिसेंच्या घटना हाेत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडून मायदेशी परतावे लागले आहे. किंबहुना दोन ते तीन दशकात देशात शिक्षणात प्रगती झाली आहे. परदेशातील अनेक नामवंत विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांनी देशात उच्च शिक्षणात प्रगती केली आहे. परिणामी अनेक विद्यार्थी अलीकडे परदेशात उच्च शिक्षणासाठी न जाता देशातच शिक्षण घेऊन रोजगाराला पसंती देत आहे.
आतापर्यंत अमरावती विद्यापीठातून उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाताना आवश्यक असलेले ‘ट्रान्सस्क्रीप्ट’ प्रमाणपत्र हे कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके, यूएस, उझबेकिस्तान, रशिया, आयर्लंड तसेच युरोपीय देशातील शिक्षण संस्था, विद्यापीठाच्या नावे पाठविण्यात आले आहे. मात्र कोरोनानंतर यात आमूलाग्र बदल झाला आहे. अमरावती विद्यापीठात गत पाच वर्षाचा लेखाजोखा बघितला तर हल्ली ‘ट्रान्सस्क्रीप्ट’ प्रमाणपत्र मागणीची विद्यार्थी संख्या सुमारे १०० ते १२५ कमी झाली आहे.
सन २०२३ मध्ये ५५७ विद्यार्थी गेले शिक्षणासाठी परदेशात
जानेवारी: ४०
फेब्रुवारी: ५०
मार्च: ४४
एप्रिल: ४४
मे: ३५
जून: ४९
जुलै: ५५
ऑगस्ट: ४३
सप्टेबर: ४९
ऑक्टोबर: ५७
नोव्हेंबर: ३९
डिसेंबर: ५२
परदेशात उच्च शिक्षण, कायमस्वरूपी रहिवासी, व्हिसा आदी कारणांसाठी विद्यापीठाकडे ‘ट्रान्सस्क्रीप्ट’ची मागणी असते. नियमानुसार सोपस्कार आटोपल्यानंतर हे प्रमाणपत्र बंद लिफाफ्यात थेट पाठविले जाते. मात्र कोरोनानंतर ‘ट्रान्सस्क्रीप्ट’ची मागणी घसरली हे मात्र खरे आहे. अनेकांनी देशातच रोजगार, नोकरीला पसंती दिली असावी. - माेनाली तोटे-वानखडे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.