चौकशीची मागणी : सरपंचांची बीईओंकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:21 AM2019-02-23T01:21:51+5:302019-02-23T01:22:11+5:30
तालुक्यातील लालखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांची परवड होत आहे. येथील सरपंचांनी शाळेत निरीक्षण केले असता, हा प्रकार उघड झाला. याची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशा मागणीची तक्रार सरपंच निरंजन राठोड (आडे) यांनी गुरुवारी खंडविकास अधिकाऱ्यांकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : तालुक्यातील लालखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांची परवड होत आहे. येथील सरपंचांनी शाळेत निरीक्षण केले असता, हा प्रकार उघड झाला. याची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशा मागणीची तक्रार सरपंच निरंजन राठोड (आडे) यांनी गुरुवारी खंडविकास अधिकाऱ्यांकडे केली.
लालखेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची स्थापना १९७२ मध्ये झाली. तेव्हापासून आजतागायत येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या शाळेतून अनेक विद्यार्थी घडल्याचा इतिहास आहे. मात्र, आजघडीला या शाळेची दैना झालेली आहे. आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी गावाचे नेतृत्व केले. परंतु, उद्याचे भविष्य घडविणाºया चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध आहे की नाही, यावर कुणाचेच लक्ष जाऊ नये, ही खेदाची बाब आहे. नवनियुक्त सरपंच निरंजन राठोड (आडे) यांनी २४ जानेवारी रोजी पदभार स्वीकारला असून, त्यांनी नुकतीच शाळेला भेट दिली असता, तेथील टीव्ही बंद अवस्थेत दिसले. तेथे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची सुविधा नाही. प्रसाधनगृहाची सोय नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी आपापल्या घरून पाण्याची बॉटल घेऊन येतात. शौचालय तर सोडाच धड लघुशंकादेखील उघड्यावर करावी लागत असल्याचे चित्र नवनियुक्त सरपंचांना उघड्या डोळ्यांनी बघावे लागले. याचा संताप व्यक्त करीत त्यांनी गुरुवारी चांदूर रेल्वे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन व तक्रार दिली. यावर तातडीने उपाययोजना करावी. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी उपसरपंच नंदा बल्लू राठोड, माजी सरपंच रमेश राठोड, शिक्षण समिती अध्यक्ष सोनू अनिल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रेम चव्हाण, प्रभारी सचिव एन.के. पवार उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड दुरुस्त व्हावेत
लालखेड ग्रामपंचायतीत तत्कालीन ग्रामसेवक गवई यांनी ग्रामस्थांकडून सन २०१६ ते २०१८ पर्यंतचे घर टॅक्स वसुली केल्याची रजिस्टरवर नोंद आहे. मात्र, त्यांनी ती रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमाच केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदर रेकॉर्डची चौकशी करणे गरजेचे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.