बहुपक्षीयांकडून फेरमतदानाची मागणी बुलंद
By Admin | Published: February 28, 2017 12:03 AM2017-02-28T00:03:45+5:302017-02-28T00:03:45+5:30
ईव्हीएम घोळाच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेसह बहुपक्षीय पराभूत उमेदवारांनी सोमवारी फेर मतदानाची मागणी बुलंद केली.
हजारोंचा सहभाग : बंदला संमिश्र प्रतिसाद, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
अमरावती : ईव्हीएम घोळाच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेसह बहुपक्षीय पराभूत उमेदवारांनी सोमवारी फेर मतदानाची मागणी बुलंद केली. शहरातील बहुतांश प्रतिष्ठाने बंद केल्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. खा.आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेचे २१ फेब्रुवारीला झालेले मतदान रद्द करून सर्व जागांसाठी फेरमतदान घ्यावे, तोपर्यंत महापालिक ेत महापौर आणि सभापती निवडीला स्थगिती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. हाती काळे झेंडे घेऊन सर्वपक्षीय कार्यकर्ते व पराभूत उमेदवारांसह त्यांचे समर्थक मोर्चात सहभागी झाले होते.
ईव्एिएममध्ये तांत्रिक घोळ करुन भाजपने त्यांचे उमेदवार निवडून आणले, असा आरोप करीत शिवसेनेसह अन्य पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्याने सोमवारी ‘अमरावती बंदं’ची हाक दिली होती. सत्ताधिशांकडून करण्यात आलेला मतदान यंत्रातील घोळ लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार असून त्याविरोधात पुकारलेल्या शहर बंदला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन खा.आनंदराव अडसूळ यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देउन काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून प्रतिष्ठाने बंद ठेवली. रविवारी शिवसेना संपर्क कार्यालयात अडसूळ यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. भाजपक्षाने या ईव्हीएममध्ये सेटिंग केल्याचा आरोप केला जात आहे. त्याचमुळे बंदचा निर्णय घेण्यात आला होता.
सोमवारी सकाळी ९ ते ११ या कालावधीत शहर बंद केल्यानंतर राजकमल चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खा.आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा राठोड, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील खराटे, माजी स्थायी सभापती अविनाश मार्डीकर, बाजार समितीचे संचालक विनोद गुहे यांच्यासह सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लिम लिगव अन्य पक्षाचे पदाधिकारी, अपक्ष सहभागी झाले.
२१ फेब्रुवारीला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान ईव्हिएममध्ये प्रचंड तांत्रिक घोळ सुनियोजितपणे घालण्यात आला. घरची हक्काची मतेसुध्दा उमेदवारांना पडली नाहीत. वियजाची शाश्वती असताना काही पराभूत झालेत, तर अनपेक्षितपणे घरी बसलेले उमेदवार निवडून आल्याचे खा.आनंदराव अडसूळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. या संपूर्ण घोळाची पारदर्शकपणे चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पराभूत उमेदवारांच्या भावना यावेळी अधिक तीव्र होत्या. (प्रतिनिधी)
भाजपक्षाच्या अनपेक्षित विजयाला विरोध
मतदान यंत्रात घोळ करून अनपेक्षित विजय संपादन केल्याच्या विरोधात पुकारलेल्या शहर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाजपविरोधात बहुपक्षीय पदाधिकारी आणि पराभूत उमेदवार सोमवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठेत फिरुन दुकाने बंद केली. काहींनी त्याला प्रतिसाद दिला. काहींनी आंदोलकांची पाठ फिरताच दुकाने उघडली. राजकमल चौक, शाम, सरोज, जयस्तंभ, अंबादेवी रोड, गांधी चौक, नमुना या भागातील बाजारपेठेत कडेकोट बंद दिसून आला.
व्यापक पोलीस बंदोबस्त
बहुपक्षिय बंद आणि मोर्चाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वासमोर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. महापालिकेचे प्रवेशद्वार तर बॅरिकेड्समय झाले होते. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सकाळी ११ च्या सुमारास महापालिका कार्यालयात फिरून सुरक्षेचा आढावा घेतला.