शाळांना प्रतिविद्यार्थी १७ हजार रुपये प्रतिपूर्ती शुल्क, चौथ्या सोडतीची पालक वर्गातून मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 07:01 PM2019-08-12T19:01:37+5:302019-08-12T19:01:57+5:30
आरटीई अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांसाठी २५ टक्के राखीव जागांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली.
अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेश देणा-या शाळांना गतवर्षीप्रमाणे ५० टक्के प्रतिपूर्ती शुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदाही विभागातील ९५५ शाळांना प्रतिविद्यार्थी १७ हजार ६१७ रुपये मिळणार आहेत.
गरिबांच्या मुलांनाही दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश घेता यावा म्हणून राज्यात ‘बालकांच्या हक्काचे व मोफत शिक्षण कायदा २००९’ अंतर्गत राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. मागील सहा वर्षांपासून अमरावती विभागात ९०० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे, तर दोन वर्षांपासून ही प्रक्रिया ऑनलाइन राबविली जात आहे. शिक्षण विभागाने २०१८-१९ चे प्रतिपूर्ती शुल्क प्रतिविद्यार्थी १७ हजार ६५७ रुपये करून ५० टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
आरटीई अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांसाठी २५ टक्के राखीव जागांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. इयत्ता पहिलीला प्रवेश मिळावा, यासाठी विभागातील पाच जिल्ह्यांमधील ९५५ शाळांची नोंदणी करण्यात आली होती. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल २६ हजार ९७३ अर्ज प्राप्त झाले होते. एकूण जागा १० हजार ५२२ असताना दुप्पटीहून अधिक अर्ज आल्याने स्पर्धा वाढली होती. अंतिम फेरीअखेर ८ हजार ४९४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यानंतर अद्याप २०२८ जागा रिक्त आहेत. विविध कारणांनी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश या जागांवर आॅफलाइन पद्धतीने करण्याची मागणी पालकांमधून होत आहे. शासनाने यावर्षी केवळ तीन फेºयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया घेण्यात आली.