रेमडेसिव्हिरच्या मागणीत ७५ टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 05:00 AM2020-12-24T05:00:00+5:302020-12-24T05:01:01+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन फारसे फायद्याचे नसल्याचे मत नोंदविले. मात्र, राज्यात याविषयी आरोग्य विभागाचे कोणतेच निर्देश नसल्याने या इंजेक्शनचा जिल्ह्यात वापर सुरू आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर या इंजेक्शनची मागणी वाढल्याने काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, जिल्हा आरोग्य यंत्रणेला शासनाकडून औषधांचा पुरवठा होत असल्याने साठा घटलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात अलीकडे कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने गंभीर रुग्णसंख्येतही घट आली आहे. परिणामी अशा रुग्णांसाठी लाभदायी असलेल्या रेमडेसिव्हिर या इंजेक्शनची मागणी आता ७० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सद्यस्थितीत १७०० व्हाॅयल उपलब्ध आहेत. याशिवाय कोरोना रुग्णांसाठीचा औषधी साठादेखील पुरेसा असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन फारसे फायद्याचे नसल्याचे मत नोंदविले. मात्र, राज्यात याविषयी आरोग्य विभागाचे कोणतेच निर्देश नसल्याने या इंजेक्शनचा जिल्ह्यात वापर सुरू आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर या इंजेक्शनची मागणी वाढल्याने काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, जिल्हा आरोग्य यंत्रणेला शासनाकडून औषधांचा पुरवठा होत असल्याने साठा घटलेला नाही. इंजेक्शन प्रोटोकॉलनुसार वापरात आल्याने याची टंचाई जाणवली नाही. मात्र, खासगीमध्ये या इंजेक्शनची टंचाई होती व वाढीव किमतीत काळाबाजारात हे इंजेक्शन विकले गेले. या इंजेक्शनचा वापर व विक्री याविषयीचे रेकाॅर्ड ठेवण्यात आल्याने यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यासाठी अन्न व औषधी प्रशासनाची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे.
आता रुग्णसंख्येत घट आलेली असली तरी रोज ३० हून अधिक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर कोविड हॉस्पिटलमध्ये होत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १७०० रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले
रोज ३० इंजेक्शनची गरज
जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणानंतर राज्यासह जिल्ह्यात या इंजेक्शनचा वापर सुरू आहे. कोरोनावर औषधच नसल्याच्या पार्श्वभूमीवर रिमडेसिव्हिरपासून काही प्रमाणात फायदा होत असल्याने याचा वापर जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात केला जात आहे. सध्या रुग्णसंख्या व गंभीर रुग्णांमध्ये कमी आल्याने रिमडेसिव्हिरच्या मागणीत कमी आलेली आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आलेख अलीकडे मंदावला आहे. त्यामुळे रेमडेसिव्हिरचा वापर कमी झालेला आहे. मात्र, आरोग्य विभागाकडे पुरेसा म्हणजे सद्यस्थितीत १७०० इंजेक्शनचा स्टॉक उपलब्ध आहे. याशिवाय रॅपिड अँटिजेनच्या ४ हजार किट उपलब्ध आहेत.
- डॉ. श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्यचिकित्सक
अँटिजेन टेस्ट, औषधीचा पुरेसा साठा उपलब्ध
जिल्ह्यात सध्या तालुका, जिल्हा रुग्णालयात याव्यतिरिक्त महापालिकेच्या दोन केंद्रांवर कोरोनाचे नमुने संकलन व रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या जात आहेत. यासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत चार हजार अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध आहेत.
कोरोना संसर्गाचे उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा पुरेसा व सद्यस्थितीत असलेल्या रुग्णसंंख्येच्या प्रमाणात एक महिना पुरेल एवढा असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.