मागणी ४६ कोटींची मिळाले २८ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 06:00 AM2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:41+5:30
गतवर्षी १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान काढणीला आलेले सोयाबीनला सडले. भिजलेल्या शेंगांमध्ये बीजांकुर निघाले. सोयाबीनचे ८० टक्कयांवर क्षेत्रात नुकसान झाले. सरकीमधूनही बीजांकुर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडअळीचा धोका वाढला. आंबिया बहराच्या फुटीसाठी ताण न मिळाल्याने संत्र्याचे नुकसान झाले. अवकाळीने केलेल्या नुकसानासाठी शासनाने प्रचलित निकषापेक्षा जास्त म्हणजेच हंगामी पिकांसाठी हेक्टरी आठ हजार व बहुवार्र्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये अशी मदत जाहीर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दहा दिवसांच्या अवकाळीने ८० टक्के खरीप हंगाम बाधित झाल्यानंतर मदतनिधीसाठीही शासनाकडून खेळखंडोबा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्याची ४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध केला. चौथ्या टप्प्याच्या १८.७७ कोटींसाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गतवर्षी १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान काढणीला आलेले सोयाबीनला सडले. भिजलेल्या शेंगांमध्ये बीजांकुर निघाले. सोयाबीनचे ८० टक्कयांवर क्षेत्रात नुकसान झाले. सरकीमधूनही बीजांकुर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडअळीचा धोका वाढला. आंबिया बहराच्या फुटीसाठी ताण न मिळाल्याने संत्र्याचे नुकसान झाले. अवकाळीने केलेल्या नुकसानासाठी शासनाने प्रचलित निकषापेक्षा जास्त म्हणजेच हंगामी पिकांसाठी हेक्टरी आठ हजार व बहुवार्र्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये अशी मदत जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ७२.४० कोटी, दुसऱ्या टप्प्यात १५८ कोटींची मदत मिळाली. तिसºया टप्प्यासाठी ४५ कोटी ९८ लाख ९२ हजार ६६५ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली असताना, सोमवारी २७ कोटी ८१ लाख ४३ हजार रुपये उपलब्ध झाले. त्यामुळे मदतीच्या चौथ्या टप्प्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
असे आहे तिसऱ्या टप्प्याचे वाटप
अवकाळीच्या मदतीच्या तिसऱ्या टप्प्यात भातकुली तालुक्यात २.२७ कोटी, तिवसा २.९६ कोटी, चांदूर रेल्वे २.९६ कोटी, धामणगाव रेल्वे २.९६ कोटी, नांदगाव खंडेश्वर २.९६ कोटी, मोर्शी १.७५ कोटी, अचलपूर २.९६ कोटी, चांदूर बाजार २.९६ कोटी, दर्यापूर २.९६ कोटी, अंजनगाव सुर्जी २.९६ कोटी, धारणी १० लाख तसेच अमरावती व चिखलदरा तालुक्यात मदतनिधीचे वाटप निरंक आहे.
खरीप पिकांचे नुकसान
संयुक्त सर्वेक्षणानुसार ३ लाख ७४ हजार ८०४ शेतकऱ्यांच्या २ लाख १२ हजार ३२९ हेक्टरवरील सोयाबीन, १ लाख ३५ हजार ४७२ हेक्टरवरील कपाशी, ११ हजार ३६ हेक्टरवरील ज्वारी, २ हजार ७०६ हेक्टरवरील तूर, ५ हजार ६३ हेक्टरवरील मका, ५ हजार ५३८ हेक्टरवरील धान, १२६ हेक्टरवरील उडीद तसेच ७४७ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले. एकूण ३ लाख ७३ हजार १९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. याव्यतिरिक्त ४५२ हेक्टर बागायती पिके व ७८ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले होते.