कृषिमंत्र्यांच्या दारासमोर स्वाभिमानीचे भीक मांगो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 09:02 PM2019-07-10T21:02:49+5:302019-07-10T21:03:07+5:30
शेतक-यांना खरिपासाठी पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्र्यांच्या वरूड येथील घरापुढे भीक मांगो आंदोलन केले.
वरूड (अमरावती) : कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या मतदारसंघातच राष्ट्रीयीकृत बँका दुष्काळाची दाहकता अनुभवणा-या शेतक-यांना खरिपासाठी पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्र्यांच्या वरूड येथील घरापुढे भीक मांगो आंदोलन केले.
शेतक-यांना दिलेल्या कर्जमाफीत सुस्पष्टता नाही. याद्या अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत. त्यातच बँका वेगवेगळी कारणे सांगून शेतक-यांना भ्रमित करीत आहेत. त्यांच्याकडून पीक कर्जाचे प्रमाण अल्प आहे. याबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. वरूड मतदारसंघात शेतक-यांनी संत्राबागा जागविण्याकरिता पदरचा पैसा खर्च केला. दागिने गहाण ठेवले. खरिपाच्या पेरणीसाठी बँकांकडून अपेक्षा होती. मात्र, वारंवार येरझारा घालूनही तेथील अधिका-यांच्या काळजाला पाझर फुटत नाही.
कर्ज नाकारल्याने यंदाची मोठ्या प्रमाणात शेती पडीक राहणार आहे. या बाबीचा निषेध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्र्यांच्या दारापुढे येऊन केला. याप्रसंगी उपस्थित शेकडो शेतक-यांनी नारेबाजी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार, ऋषीकेश राऊत, संदीप खडसे, रवींद्र वंजारी, किशोर हेलोडे, नितीन नतीले, दिगंबर बोबडे, सुमीत गुर्जर, गोपाल घोरमाळे, विवेक शहाणे, सचिन ढोके, रामराज चोपडे, संजय सलामे आदी आंदोलनात सहभागी झाले.