‘वेस्ट’ संत्र्याला हैद्राबादेत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 01:14 AM2019-05-05T01:14:45+5:302019-05-05T01:15:09+5:30
तालुक्यातील वणी बेलखेडा येथील सलीम खान करीम खान या शेतकऱ्याने झाडावरून गळून पडलेल्या बोराच्या आकाराची संत्री खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. हैद्राबादला त्या संत्र्यापासून नामांकित कंपनीकडून रक्तदाबाची औषधी तयार होते.
सुमीत हरकूट।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यातील वणी बेलखेडा येथील सलीम खान करीम खान या शेतकऱ्याने झाडावरून गळून पडलेल्या बोराच्या आकाराची संत्री खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. हैद्राबादला त्या संत्र्यापासून नामांकित कंपनीकडून रक्तदाबाची औषधी तयार होते. ‘वेस्ट’पासून ‘बेस्ट’ बनविणाºया या व्यवसायातून सलीम खान यांनी इतरांनाही रोजगार दिला.
काही वर्षांपासून सातत्याची नापिकी व शेतमालाचे पडलेले भाव यामुळे भरडून गेलेला शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. तथापि, वणी बेलखेडा या लहानशा गावातील सलीम खान या तरुणाची पूरक व्यवसायाची धडपड सुरू होती. झाडाखाली गळून पडलेली लहान आकाराची संत्रा फेकली जातात, हे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी संत्री कुणाच्या उपयोगाची असेल, याबाबत शोध घेतला. यादरम्यान हैद्राबाद येथील औषध कंपनीशी संपर्क केला. येथे रक्तदाब व रक्तस्राव थांबविण्यासाठी औषध तयार केले जात असल्याचे समजले. तेव्हापासून झाडाखाली गळून पडलेली संत्री गोळा करून ते विकतात.
एक मजूर दिवसभरात नऊ ते दहा किलो लहान संत्री सहजरीत्या गोळा करतो. काही मजूर रोजगार मिळत नसल्यास ही बोराएवढी संत्री गोळा करण्याकरिता बागेत जातात. परिसरात मोठ्या प्रमाणात संत्राबागा असल्याने सलीम खान यांच्याकडे दररोज दोन ते तीन क्विंटल आवक होत आहे.
एक किलो संत्र्याला ४५ रूपये
संत्राबागेत निंदण करतानाच शेतमजूर झाडावरून गळून पडलेल्या बोराच्या आकाराची संत्री गोळा करू लागले. पूर्णत: सुकलेली संत्री ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो, तर ओली संत्री २५ रुपये किलो दराने सलीम खान खरेदी करीत आहेत. मजुराला १२५ ते १५० रुपये अतिरिक्त रोजगार मिळत आहे. आंबिया बहराच्या वेळी सलीम यांचा व्यवसाय अधिक बहरतो.