४८ हजारांची मागितली लाच; चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 06:03 PM2022-09-15T18:03:55+5:302022-09-15T18:08:18+5:30

मुऱ्हादेवी ग्रामपंचायतमधील प्रकार, सदस्य-उपसरपंच महिलांचे पतीही गजाआड

Demanded bribe of 48 thousand; ACB arrested four Gram Panchayat members of muradevi | ४८ हजारांची मागितली लाच; चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती एसीबीच्या जाळ्यात

४८ हजारांची मागितली लाच; चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती एसीबीच्या जाळ्यात

Next

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेली तक्रार मागे घेण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापकांकडून तब्बल ४८ हजारांची लाच घेणाऱ्या चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती व एक सदस्य महिलेचा पती अशा सहाजणांना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अंजनगाव सुर्जी येथील त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ अँड रेडियम आर्ट येथे हा ट्रॅप यशस्वी केला. सहाहीजण अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा येथील रहिवासी आहेत.

अटक लाचखोर आरोपींमध्ये मुऱ्हादेवी ग्रामपंचायत सदस्य दामोदर धुमाळे (वय ६५), मनोज कावरे (४३), लालदास वानखेडे (४३), मोहम्मद इब्राहिम अब्दुल नबी (६०) यांच्यासह ग्रामपंचायत सदस्याचा पती शिवदास पखान (५२) व उपसरपंच महिलेचा पती सुरेश वानखेडे यांचा समावेश आहे. त्यांनी गावातील प्रभारी मुख्याध्यापकाला ५५ हजार रुपये लाच मागितली होती. त्यापैकी ४८ हजार रुपये घेताना त्यांना पकडण्यात आले. संबंधित मुख्याध्यापकाने शाळा इमारतीचे निर्लेखन करून लिलाव केला होता. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य दामोदर धुमाळे व लालदास वानखेडे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ती तक्रार मागे घेण्याकरिता धुमाळे व वानखेडे हे ५५ हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार १३ सप्टेंबर रोजी एसीबीकडे करण्यात आली.

पडताळणीदरम्यान धुमाळे व कावरे यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. वानखेडे यांनी ८ हजार स्वीकारण्याचे मान्य केले. शिवदास पखाण, मोहम्मद इब्राहिम व सुरेश वानखेडे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. १४ सप्टेंबर रोजी कावरे याने स्वतःसह धुमाळेकरिता २५ हजार लाच रक्कम स्वीकारली, तर वानखेडे याने स्वत:सह अन्य जणांसाठी २३ हजार रुपये लाच स्वीकारली.

एसपींच्या मार्गदर्शनात मेगा कारवाई

अमरावती परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वात अप्पर पोलीस अधीक्षकद्वय अरुण सावंत व देविदास घेवारे, उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीश उमरे, संतोष इंगळे, योगेश कुमार दंदे यांच्यासह अंमलदार युवराज राठोड, विनोद कुंजाम, कुणाल काकडे, रवींद्र मोरे, रोशन लोखंडे, बारबुद्धे व गोवर्धन नाईक यांनी ही कारवाई यशस्वी केली.

Web Title: Demanded bribe of 48 thousand; ACB arrested four Gram Panchayat members of muradevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.