संपुर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून पाच लाखांची मागणी ; तडजोडीअंती ५० हजारात रेडी!

By प्रदीप भाकरे | Published: November 29, 2024 05:39 PM2024-11-29T17:39:15+5:302024-11-29T17:41:30+5:30

गुन्हा दाखल करण्याची भीती : लाचखोर दोन पोलीस कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

Demanding five lakhs by showing fear of filing a case against the entire family; Ready for 50 thousand after compromise! | संपुर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून पाच लाखांची मागणी ; तडजोडीअंती ५० हजारात रेडी!

Demanding five lakhs by showing fear of filing a case against the entire family; Ready for 50 thousand after compromise!

प्रदीप भाकरे 
अमरावती :
संपुर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून साहेबांना पाच लाख रुपये द्यावे लागतिल, अशी बतावणी करून ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २९ नोव्हेंबर रोजी अटक केली. लाचखोर दोन्ही पोलीस अंमलदार हे स्थानिक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
             

एसीबीनुसार, सतीश सुभाष सावरकर (३९, रा. शासकीय वसाहत, कांतानगर) व अनिरुद्ध नामदेवराव भीमकर (३३, रा. कैलासनगर) अशी अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराच्या मंगलधाम परिसरातील न्यू कॉलनी येथील जुन्या घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दामिनी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे जावून तक्रारदार यांना तू इथे अवैध धंदे चालवितो, असे म्हटले. तथा त्यांच्या घराचे फोटो काढले. त्यानंतर तक्रारदार यांच्या भावाला फ्रेजरपुरा ठाण्यात नेण्यात आले. तक्रारदार यांनाही पोलीस ठाण्यात येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळाने पोलीस शिपाई सतीश सावरकर याने तक्रारदार यांना मोबाइलवर कॉल केला. तुझ्या भावावर व संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करतो, यातून तुला वाचायचे असेल, तर साहेबांना ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे तो तक्रारदाराला म्हणाला. त्यावर तक्रारदाराने येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न
तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या पडताळणीत पोलीस शिपाई सतीश सावरकर व अनिरुद्ध भीमकर यांनी तक्रारदार यांना त्यांच्या भावावर व संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करतो, अशी भीती दाखवून गुन्हा दाखल न करण्यासाठी तडजोडीअंती ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. परंतु, सावरकर व भीमकर यांना तक्रारदारांवर संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र, लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सतीश सावरकर व अनिरुद्ध भीमकर यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेशकुमार दंदे व केतन मांजरे, आशिष जांभोळे, प्रमोद रायपुरे, शैलेश कडू, उपेंद्र थोरात, चंद्रकांत जनबंधू यांनी केली.

Web Title: Demanding five lakhs by showing fear of filing a case against the entire family; Ready for 50 thousand after compromise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.