ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे देहवसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 08:38 PM2019-01-10T20:38:44+5:302019-01-10T20:39:44+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पाईक तथा ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पाईक तथा ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. वरूड येथे मुलाच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. मुळचे वरखेड येथील बेलूरकर यांना राष्ट्रसंतांचा सहवास लाभला होता. राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचार, प्रसारात त्यांनी उभे आयुष्य वेचले.
राष्ट्रसंतांच्या हयातीत त्यांना ग्रामगीताचार्य म्हणून गौरविण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेचे आजन्म प्रचारक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या रामकृष्णदादांनी अनेक गावांत वाचनालये, व्यायामशाळा व श्रीगुरुदेव सेवा मंडळांची स्थापना केली. रामकृष्णदादा हे उत्तम मल्ल, व्यायामपटू, नाट्य कलावंत व दिग्दर्शक, शाहीर, कवी व लेखक, आदर्श प्रबोधनकार, कीर्तनकार, आयुवेर्दाचार्य तसेच ज्येष्ठ समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध होते. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे संचालक असलेले रामकृष्णदादांनी मंजूळामाता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सीतारामदास स्वामी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी सुमारे ७५ पुस्तके लिहिलीत. अनेक पुस्तकांचे संपादन केले. सुश्राव्य वाणीतून रसिकांची मने जिंकणाऱ्या दादांनी रुग्णांवर आयुर्वेदिक उपचारसुद्धा केले. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजीपंत येथे दादांनी सन १९९३ मध्ये मानव विकास ज्ञान साधनाश्रमाची निर्मिती केली. दादांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, समर्थ लहानुजी महाराज, दामोदर महाराज, भूदानाचे प्रणेते विनोबा भावे, श्री. संत गाडगेबाबा, कृषी महर्षी पंजाबराव देशमुख यांच्यासह अनेक विभूतींचा सहवास लाभला. समाजप्रबोधनासह संस्कार, क्रीडा, वाचनालय, ग्रंथसंपादन अशा नानाविध पातळीवर ते तहहयात कार्यरत होते. रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या पार्थिवावर शुक्रवार, ११ जानेवारी रोजी त्यांनीच उभारलेल्या तळेगाव शामजीपंत येथील मानव विकास ज्ञान साधनाश्रमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव वरखेडमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मानित
रामकृष्णदादा बेलुरकर यांना विदर्भ साहित्य संमेलन नरखेड येथे वा.कृ. चोरघडे स्मृती साहित्य पुरस्कार, माणिकलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरद्वारा दे.ग. सोटे ग्रामीण साहित्य पुरस्कार, गांधी जिल्हा ज्येष्ठ समाजसेवक सन्मान, राष्ट्रसंत साहित्य संमेलन २००० मध्ये ग्राममहर्षी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सन २००४ चा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, आदिवासी विकास मंत्रालयाचा सन २००५ मध्ये आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सन २००८ मध्ये सांस्कृतिक किर्तन/समाज प्रबोधन पुरस्कार, सन २०११ मध्ये जीवनव्रती स्वामी विवेकानंद पुरस्कार, सन २००९ तुका म्हणे खंजेरी, संशोधनात्मक साहित्य पुरस्कार, मुंबई येथे सन २०१२ मध्ये विदर्भ भूषण पुरस्कार, तसेच सन २०१३ मध्ये प्रबोधनकार के.सी. ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार यासह डझनावरी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहेत.