विवाहापूर्वीच नियोजित वराने केली शरीरसुखाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:11 PM2018-08-22T22:11:54+5:302018-08-22T22:12:12+5:30
विवाहापूर्वी डॉक्टर तरुणीला चिखलदराला नेऊन नियोजित डॉक्टर वराने तिच्यावर शरीरसुखासाठी दबाव टाकला. तिने नकार दिल्याने विनयभंग करून पाच लाखांच्या हुंड्याची मागणी केल्याची तक्रार पीडिताने मंगळवारी सायंकाळी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विवाहापूर्वी डॉक्टर तरुणीला चिखलदराला नेऊन नियोजित डॉक्टर वराने तिच्यावर शरीरसुखासाठी दबाव टाकला. तिने नकार दिल्याने विनयभंग करून पाच लाखांच्या हुंड्याची मागणी केल्याची तक्रार पीडिताने मंगळवारी सायंकाळी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली.
पोलीस सूत्रानुसार, आशिष रमेश करोडे (रा. नाचगाव, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. अमरावती शहरातील रहिवासी एका डॉक्टर तरुणीचे आशीष करोडेशी २७ मे रोजी साक्षगंध पार पडले. ९ नोव्हेंबर रोजी लग्न ठरले. दरम्यान, आशीषने दोन लाखाची रोख व तीन तोळे सोन्याची मागणी केली. याशिवाय मुलीला फोन करून चिखलदरा सहलीकरिता येण्यासाठी दबाव टाकला. नियोजित पतीच असल्याने तिने होकार दिला. २२ जुलै रोजी ती आशिषसोबत सहलीसाठी गेली. त्या ठिकाणी आशिषने बळजबरी करून शरीरसुखाची मागणी तिच्याकडे केली. आशिषने लज्जास्पद कृत्य केल्याचे पाहून ती विवंचनेत पडली. मात्र, त्याला तिने ठामपणे नकार दिला. यामुळे चिडलेल्या आशिषने पुन्हा पाच लाख मागितले आणि न दिल्यास लग्न करणार नाही, असा पवित्रा घेतला. आपला विश्वासघात व फसवणूक केल्याचे पीडिताच्या निदर्शनास येताच या घटनेची तक्रार पीडिताने फे्रजरपुरा पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी आरोपी आशिष करोडेविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४२०, ३५४, ५००, ५०१, सहकलम ३, ४, हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.
पीडित मुलगी सुशिक्षित आहे. तिची तक्रार प्राप्त झाली असून, आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.
- आसाराम चोरमले
पोलीस निरीक्षक.